शिवाजी विद्यापीठास यूजीसीकडून ‘कॅटेगरी-1’ दर्जा | पुढारी

शिवाजी विद्यापीठास यूजीसीकडून ‘कॅटेगरी-1’ दर्जा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-1’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. विद्यापीठास आता अनुदानाबरोबरच विविध गोष्टींची स्वायत्तता मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय 2018मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळूर) यांचे 3.51 सीजीपीए गुणांकन व त्यावरील गुणांकन प्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-1’, 3.26 ते 3.50 या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-2’ व त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-3’ अशी ही श्रेणी रचना करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठास नॅकच्या 3.52 सीजीपीए गुणांकनासह ‘ए++’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे यूजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-1’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयी-सुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. राज्यातील शिवाजी

विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठांचा यात समावेश आहे. विद्यापीठ आता पुढे जात असून आवश्यक कन्टेन्ट विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात याचे आणखी लाभ विद्यापीठास पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील, अशी आशा कुलगुरु डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.

‘दूरशिक्षण’विभागास सलग पाच वर्षासाठी मान्यता…

विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला यूजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. त्याचप्रमाणे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यास मान्यता मिळू शकते. विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले असल्याचे कुलगुरु डॉ. शिर्के यांनी सांगितले.

Back to top button