कर्मचार्‍यांना त्रास दिला,तर याद राखा ; आमदार पवार यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना सुनावले | पुढारी

कर्मचार्‍यांना त्रास दिला,तर याद राखा ; आमदार पवार यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना सुनावले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास दिला, तर याद राखा. त्यांच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही. त्यांनी तुमच्या विरोधात आंदोलन सुरू केले, तर मी पाच हजार लोक घेऊन आंदोलनात सहभागी होईल, असे खडेबोल आमदार रोहित पवार यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना सुनावले.  आमदार पवार यांनी श्रीगोंदा आगारास भेट देऊन तेथील चालक-वाहकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, हरिदास शिर्के, ओंकार गुंड, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप उपस्थित होते. यावेळी कर्मचारी वर्गाने सहायक वाहतूक अधीक्षक आहेर यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक कर्मचार्‍यांना त्रास देतात. त्यांच्या मनमानी कारभाराला कर्मचारी कंटाळले आहेत, असा तक्रारीचा पाढा वाचताना कर्मचार्‍यांना अश्रू अनावर झाले होते.

अधिकार्‍याविरोधात तक्रारी ऐकताच आमदार पवार यांनी संबंधित अधिकार्‍याकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावर आमदार पवार चांगलेच संतप्त झाले. मी तुम्हाला जे सांगतोय, विचारतोय, ते तुम्ही लाईटली घेऊ नका. कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास दिला, तर याद राखा. तुम्ही मनमानी कारभार करत असाल तर ते खपवून घेणार नाही. कर्मचार्‍यांनी उद्या तुमच्या विरोधात आंदोलन सुरू केले, तर पाच हजार लोक सोबत घेऊन आंदोलनात सहभागी होईल.

दरम्यान, आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कर्जत तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. यावर विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध होतील, याची खबरदारी घ्या अशाही सूचना आमदार पवार यांनी केल्या. त्यावर बस वेळेवर जातील, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिली.

मंत्री सावंत जास्त हवेत राहू नका
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भर सभेत मराठा समाजाबाबत बेताल वक्तव्य केले. त्याबाबत आमदार पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी मंत्री सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. तुम्ही मंत्री झाला म्हणजे जास्त हवेत जाऊ नका. सार्वजनिक जीवनात काम करताना नैतिकता पाळावी लागते. मंत्री सावंत यांनी पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे. त्यांनी माफी मागितली असली, तरी बोलताना भान ठेवायला हवे असेही आमदार पवार म्हणाले.

Back to top button