राजाराम कारखान्यात परिवर्तन न झाल्यास 7/12 वर अमल महाडिकांचे नाव लागेल : सतेज पाटील | पुढारी

राजाराम कारखान्यात परिवर्तन न झाल्यास 7/12 वर अमल महाडिकांचे नाव लागेल : सतेज पाटील

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : राजाराम कारखान्याची निवडणूक कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल. कारखाना राजारामच्याच नावावर ठेवायचा असेल तर आपल्याला स्वाभिमानी लढाई लढायला लागेल, यश आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे, सभासदांत परिवर्तनाची लाट आहे. राजाराममध्ये परिवर्तन झाले नाही तर येणार्‍या काळात राजाराम कारखान्याच्या 7/12 वर अमल महाडिक यांचे नाव लागेल, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

30 सप्टेंबर रोजी होणार्‍या राजाराम कारखाना वार्षिक सभेच्या पूर्वतयारीसाठी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने होते. बैठकीस आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

राजारामच्या वार्षिक सभेला सर्व तालुक्यांतील परिवर्तन आघाडीच्या समर्थक आणि सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधार्‍यांकडून घ्यावीत, परिवर्तन आघाडीकडून ठरलेल्या सभासदांनीच प्रश्न विचारावेत, अशी सूचना सतेज पाटील यांनी केली. आपल्याला घरपोच चिवड्याचे पाकीट आले, याचा अर्थ सताधार्‍यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. राजाराम कारखाना छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाचा आहे, शाहू महाराजांच्या जन्मभूमीतला कारखाना आहे सभासद चिवड्याच्या पाकिटाला भूलणार नाहीत, हे दाखवायचे काम आपल्याला येणार्‍या निवडणुकीत करावे लागणार आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, दोनवेळा आपण राजाराम कारखान्याची निवडणूक लढवली. आता ही तिसरी निवडणूक आहे. लढाई लढायचे आपण थांबलेलो नाही. मागच्या निवडणुकीमध्ये 109 मतांपासून ते अडीचशे मतांपर्यंत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे पॅनल मागे पडले. चार-पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द झाले आहे. यामुळे येणार्‍या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे; पण कोणीही गाफील न राहता आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.

बैठकीला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शिवसेनेचे बाजीराव पाटील, विजयसिंह मोरे, धनराज घाडगे, अभिजित भंडारी, अशोक भगवानराव पवार, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती हिंदुराव ठोंबरे यांच्यासह सात तालुक्यांतील सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. मोहन सालपे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.तानाजी चव्हाण यांनी आभार मानले.

Back to top button