नगर : पुढारी वृत्तसेवा
अहमदनगरच्या नामांतराचा विषय महत्त्वाचा नसून जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. नगरचे नामांतर नगरकर ठरवतील, असे मत व्यक्त करतानाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वपक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या 'अहिल्यानगर' नामांतर मागणीची हवाच काढून घेतली. उड्डाणपुलाच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे.
याकामाच्या प्रारंभाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याकडे लक्ष वेधता, खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला.
त्याचा बहुतांश जीवनप्रवासही नगर जिल्ह्यात झाला. त्यांचे कार्य मोठे आहे. आता जिल्ह्याच्या नामांतराचा विषय निवडणूक लढवताना मी किंवा आमदारांनी जनतेसमोर मांडलेला नाही. तो विषय आमच्या विकासाच्या अजेंड्यावर नव्हता. त्यामुुळे जी गोष्ट जनतेसमोर मांडलेली नाही त्या गोष्टीवर भाष्य करणार नाही.
जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांकडून होत नाही. नगर जिल्ह्याचे नाव काय असावे हे जिल्ह्यातील नागरिक ठरवतील. नगरला नावलौकिक मिळविण्यासाठी अनेकांचा त्याग आहे. लोकांचा एकमत होत नाही तोपर्यंत यावर पडदा टाकावा, असे मत खासदार डॉ. विखे यांनी व्यक्त केले.
जिल्हा विभाजनचा अनेक दिवसांचा प्रश्न आहे. पण नगरचे विभाजन झाले नाही पाहिजे. एकतेत जिल्ह्याची ताकद आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे, असेही खासदार डॉ. विखे म्हणाले.
मनसेची सभा झाली की शिवसेनेची सभा होते. मुख्यमंत्र्याच्या सभेचा आता खेळ झाला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून विकासकामांपेक्षा दुसर्या कामात गुंतवून ठेवणे आणि ते त्यात भरकटत चालले याचे मला दुः ख वाटते. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यांचे आमदार एवढे अस्वस्थ का? असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा