लंडन ः ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन, जागतिक तापमानवाढ व हवामान बदल यांचे अनेक द़ृश्य परिणाम जगासमोर येत आहेत. आता संशोधकांनी म्हटले आहे की याच कारणामुळे रशियातील सैबेरियन टुंड्रा प्रदेश येत्या पाचशे वर्षांमध्येच नष्ट होऊन जाऊ शकतो. टुंड्रा प्रदेशातील भूप्रदेश आता सध्यासारखा भविष्यातही पाहायला मिळेल की नाही याची संशोधकांना खात्री नाही. जर्मनीतील संशोधक आल्फेड वगेनर यांनी सांगितले की आर्क्टिक प्रदेशातील उष्णता टुंड्राच्या नष्ट होण्याने आणखी वाढू शकण्याचा धोका आहे. तेथील जैवविविधता तसेच मानवी संस्कृतीही धोक्यात सापडू शकते.
गेल्या काही दशकांच्या काळात आर्क्टिक प्रदेशातील तापमानात वाढच होत चालली आहे. जगाच्या अन्य भागाच्या तुलनेत दुप्पट वेगाने ही वाढ होत आहे. 1960 ते 2019 या काळात तेथील तापमानात सुमारे 7.2 अंश फॅरेनहाईट म्हणजेच 4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. या तापमानामुळे समुद्रावरील बर्फाचा स्तर वितळत असून आर्क्टिकच्या भूमीवरही त्याचा परिणाम होत आहे. हा परिणाम सैबेरियावरही दिसत आहे.