ठाणे; पुढारी ऑनलाईन : तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्याच व्हा, असा धीराचा सल्ला बोटे तुटलेल्या कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली होती, मात्र त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून बोटे पुन्हा जोडण्यात आली आहेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी कल्पिता पिंपळेंची भेट घेतल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना कठोर कारवाईचा शब्द दिला. तसेच सरकार त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला रोज रिपोर्ट येतात. उगीच त्रास नको म्हणून लवकर संपर्क साधला नाही. मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा.
मुख्यमंत्र्यांनी फोनवरून धीर दिल्यानंतर बळ मिळाल्याची प्रतिक्रिया कल्पिता पिंपळे यांनी दिली. त्यांच्या बोटावर आणखी एक शस्त्रक्रिया आज होणार आहे, हा आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा लॉस असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला हा दुःखद आहे, मात्र अशा प्रकारचा हल्ला करणाऱ्याची हिंमत ठेचून काढली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. आमचे आंदोलन हे अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात नसून अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात असल्याचे सांगून पोलिस आणि न्यायालयाकडून उचित कारवाई होईल, असा असा आम्हाला विश्वास असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते.
ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते.
हे ही वाचलं का?