Latest

गुगलने डूडल साकारुन डॉ. कादंबिनी गांगुली यांचे केले स्‍मरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारी व्‍यक्‍ती इतिहास घडवते. त्‍यांची कामगिरी कालातीत असते. त्‍यामुळेच अशा ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या महान व्‍यक्‍तींचे स्‍मरण हे आजच्‍या पिढीसाठी मार्गदर्शक ठरते. असेच एक इतिहास घडविणार नाव डॉ. कादंबिनी गांगुली. आज त्‍यांची १६०वी जयंती. यानिमित्त गुगलने डूडल साकारुन डॉ. कादंबिनी गांगुली यांचे स्‍मरण केले आहे.

सर्व सामाजिक बंधने ही केवळ महिलांसाठीच असतात, असा नियम असणारा तो काळ होता. या काळात महिलांनी केवळ
उंबर्‍याच्‍या आतच आपले जीवन जगावे, असा अलिखित नियमच होता.

रुढी आणि परंपरांच्‍या नावाखाली महिलांना एका चौकटीतच आपले जीवन जगावे लागे. अशा काळात कादंबिनी ब्रिटनमध्‍ये जातात. तेथे वैद्‍कीय शिक्षण पूर्ण करतात आणि मायभूमीत परत येवून देशवासियांची सेवा करतात, हा जीवनप्रवास आज सांगणे खूप सोपे आहे; पण कादंबिनी यांनी यासाठी दाखवलेले धैर्य हे आजच्‍या पिढीसाठी आदर्श ठरले आहे.

वडिलांनी दिले शिक्षणासाठी प्रोत्‍साहन

कादंबिनी गांगुली यांचा जन्‍म १८ जुलै १८६१ रोजी बिहारमधील भागलपूर येथे झाला. त्‍यांचे वडील बृजकिशोर बासू हे उदारमतवादी होते. त्‍यांनी आपल्‍या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्‍साहन दिले.

१८८२ मध्‍ये कादंबिनी यांनी कोलकाता विश्‍वविद्‍यालयातून बी.ए.ची परीक्षा उर्त्तीण झाल्‍या. यानंतर त्‍यांचा विवाह ब्राम्हो समाजाचे नेते प्राध्‍यापक व्‍दारकानाथ गंगोपाध्‍याय यांच्‍याशी झाला.

पती व्‍दारकानाथ गंगोपाध्‍याय यांनी दिलेल्‍या पाठिंबा आणि प्रोत्‍साहनामुळे त्‍यांनी वैद्‍यकीय शिक्षण पूर्ण केले.
१८८४मध्‍ये त्‍यांनी कोलकाता मेडिकल कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. या काळात वैद्‍यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणार्‍या त्‍या
पहिल्‍याच महिला होत्‍या.

ब्रिटनमध्‍ये जावून घेतले वैद्‍यकीय शिक्षण

ब्रिटनमध्‍ये जावून त्‍यांनी स्‍त्री रोग तज्‍ज्ञ अभ्‍यासक्रम पूर्ण केला. १८९० मध्‍ये त्‍या भारतात परतल्‍या. त्‍यांनी वैद्‍यकीय सेवा सुरु केली.

बंकिमचंद्र चट्‍टोपाध्‍याय यांच्‍या साहित्‍याचा कादंबिनी यांच्‍यावर प्रभाव होता. याच विचारातून त्‍यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्‍याचबरोबर सामाजिक कार्यातही त्‍यांनी आपले योगदान दिले.

मुलींसाठीच्‍या शाळेमध्‍ये त्‍यांनी महिलांना गृह उद्‍योगाचे प्रशिक्षण दिले. १८८९मध्‍ये मद्रास येथे झालेल्‍या भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेसच्‍या अधिवेशनात त्‍यांनी भाषण दिले. काँग्रेस अधिवेशनात भाषण देणारी पहिली महिला, असाही गौरव त्‍यांच्‍या नावावर आहे.

१९०६मध्‍ये कोलकाता येथे झालेल्‍या काँग्रेसच्‍या महिला संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदही त्‍यांनी भूषवले होते.याच काळात महात्‍मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेमध्‍ये वर्णभेदाविरोधात सत्‍याग्रह आंदोलन सुरु होते.

या आंदोलनास सहाय करण्‍यासाठी कादंबिनी यांनी देणगी गोळा केली होती. आपल्‍या शिक्षण आणि सामाजिक कार्यातून त्‍यांनी केवळ महिलांसमोरच नव्‍हे तर युवापिढीसमोरही आदर्श ठेवणार्‍या कादंबिनी गांगुली यांचे ३ ऑक्‍टोबर १९२३ रोजी त्‍यांचे कोलकाता येथे निधन झाले.

हे वाचलं का? 

SCROLL FOR NEXT