Latest

गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वे पुढे सरसावली, रोहा आणि चिपळूण दरम्यान ३२ मेमू धावणार

स्वालिया न. शिकलगार

रोहे (जि. रायगड) : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाची तयारी सर्व स्तरावरुन सुरू आहे. येत्या गणेश उत्सवासाठी मध्य रेल्वे पुढे सरसावली आहे. रोहा ते चिपळूण यादरम्यान ३२ मेमू रेल्वे गाड्या धावणार आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली. याबाबत प्रसिद्धी पत्रक १२ जुलै २०२२ रोजी जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रसारीत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गणेश भक्तांच्या कोकणातील प्रवास मध्य रेल्वेमुळे सुखकर होणार आहे.

चाकरमानी यांना आपल्या गावी असलेल्या गणेशोत्सवाची ओढ असते. त्यासाठी गणेश भक्त दोन महीने आधीपासून तयारीला लागतो. २०२२ च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान ३२ मेमू गाड्या चालवणार आहे. या ३२ जादा गाड्यांमुळे २०२२ मध्ये एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या १९८ होईल.

मेमू गणपती विशेष गाड्यांचे वेळापत्रक

01157 मेमू दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२ पर्यंत, दि. २७.८.२०२२ ते ०५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) रोहा येथून दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.01158 मेमू चिपळूण येथून दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२, दि. २७.८.२०२२ ते ५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) पर्यंत दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

या गाड्यांसाठी रोहा ते चिपळूण दरम्यान माणगांव,वीर,करंजाडी,विन्हेरे आणि खेड हे थांबे असून, सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या मेमू ट्रेनसाठी यूटीएस सिस्टमद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात. या मेमू ट्रेनच्या थांब्यांच्या वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्याu[ किंवा NTES ॲप डाउनलोड केल्यास अधिक माहीती प्रवाशांना मिळणार आहे. कोविड सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT