अंबाजोगाई (बीड); पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे देणार असल्याचे जाहीर करत परळीत आलेल्या करुणा शर्मा यांना पोलिसांनी रविवारी ॲट्रॉसिटीच्या आरोपाखाली अटक केली होती. सोमवारी दुपारी त्यांना अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
परळीत येऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील ठोस पुरावे देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्या रविवारी दुपारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या.
करुणा वैद्यनाथ देवस्थानच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. पण महिलांनी त्यांना घेराव घातला.
याच दरम्यान शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडली. यामुळे खळबळ उडाली.
पिस्तूल माझे नसल्याचे सांगत आपल्याला अडचणीत आणण्यासाठी कोणीतरी पिस्तूल गाडीत टाकल्याचा आरोप शर्मा यांनी केला.
करुणा शर्मा यांनी मारहाण केल्याची तक्रार दोन महिलांनी पोलिसांत दिली. त्यानंतर करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.