Latest

Yuzvendra Chahal IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू यजुवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वोधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला बाद करून ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला आहे.

ब्राव्होने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने त्याला मागे टाकत केवळ १४३ सामन्यांत ही कामगिरी केली. चहल राजस्थानच्या आधी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळत होता. त्याचवेळी ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे. कोलकाता विरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात २५ धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये १४३ सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.

IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (सामने) :

  • यजुवेंद्र चहल (१४३) – १८७
  • ड्वेन ब्रावो (१६१) – १८३
  • पीयूष चावला (१७६) – १७४
  •  अमित मिश्रा (१६०) – १७२
  •  रविचंद्रन अश्विन (१९६) – १७१

काय घडलं मॅचमध्ये?

अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक फटकावल्यानंतर ४७ चेंडूंत नाबाद ९८ धावांची झंझावाती खेळी साकारणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने केकेआरचा ४१ चेंडू व ९ गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. केकेआरला ८ बाद १४९ धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने १३.१ षटकांत १ बाद १५१ धावांसह सर्व आघाड्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले.

विजयासाठी १५० धावांचे आव्हान असताना, जैस्वालने राणाच्या पहिल्याच षटकात २६ धावांची आतषबाजी करत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. पुढे त्याने १३ चेंडूंत अर्धशतक फलकावर लावले तर हाच धडाका नंतरही कायम ठेवत चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या या झंझावाती खेळीत १२ चौकार व ५ उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याने यादरम्यान २०८.५१ असा लक्षवेधी स्ट्राइक रेट नोंदवला.
कर्णधार जोस बटलर खाते उघडण्यापूर्वीच धावचीत झाल्याने राजस्थानला प्रारंभी मोठा धक्का बसला. पण, केकेआरसाठी हे या लढतीतील एकमेव यश ठरले. नंतर जैस्वाल व संजू सॅमसन यांनी १२१ धावांची अभेद्य भागीदारी साकारत राजस्थानच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT