पुढारी ऑनलाईन: भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती घेतली आहे. या घटनेमुळे 2009 मध्ये आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात डोळ्यांसमोर येतो.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री येदिगुरी संदिंथी राजशेखर (वायएसआर) रेड्डी हे मानवतावादी नेते मानले जातात. 2004 ते 2009 या काळात त्यांनी दोनदा राज्याची कमान सांभाळली. 2 सप्टेंबर 2009 रोजी त्यांचे हेलिकॉप्टर नल्लमालाच्या जंगलात अचानक क्रॅश झाले. त्याचे अवशेष दुसऱ्या दिवशी कर्नूलमध्ये सापडले. या अपघातात वायएसआर रेड्डी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेदनादायक अपघाताची बातमी ऐकून राज्यात 122 लोकांचा मृत्यू झाला. यातील अनेकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला तर काहींनी आत्महत्या केल्या.
वायएसआर रेड्डी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर 2 सप्टेंबर रोजी नल्लामल्लाच्या जंगलात बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी कुर्नूलपासून काही अंतरावर असलेल्या रुद्रकोंडा टेकडीवर त्यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य चार जणांचाही या अपघातात मृत्यू झाला. असे मानले जाते की, त्यांचे क्रॅश हेलिकॉप्टर शोधण्यासाठी भारतातील सर्वात मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. ज्यामध्ये IAF ची कमी उंचीची विमाने आणि थर्मल इमेजिंग सिस्टमने सुसज्ज सुखोई 30 MKI विमानाचा समावेश होता. यासोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपग्रहाद्वारेही या मोहिमेत मदत केली होती. या सर्च ऑपरेशनसाठी केंद्राने सीआरपीएफचे पाच हजार जवान पाठवले होते आणि जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्याशी परिचित असलेले ग्रेहाऊंड हे नक्षलविरोधी दलही या ऑपरेशनमध्ये गुंतले होते.
दुसऱ्या दिवशी (3 सप्टेंबर) सुमारे 24 तासांनंतर IAF Mi-8 हेलिकॉप्टरला अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हेलिकॉप्टर क्रॅश होऊन रेड्डी यांच्यासह पाचही जण ठार झाल्याची घोषणा केली.