Latest

आजचा दिवस खूप महत्त्वाचा! १२ ते १४ वयोगटातील मुलांनी लस घ्यावी, पंतप्रधान मोदींचे आवाहन

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील सर्व मुलांनी लस घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारत पूर्वीपेक्षा जास्त सुस्थितीत आहे, पण लोकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही मोदी यांनी नमूद केले आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. शिवाय गंभीर आजार असलेल्या 60 वर्षांवरील लोकांनाही बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणतात की, सर्व पात्र मुलांनी व नागरिकांनी वेळेवर लस घ्यावी, असे माझे आवाहन आहे.

देशाची लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी व विज्ञान आधारित आहे. आतापर्यंत 180 कोटी डोसेस देण्यात आले असून यातील 9 कोटी डोसेस 15 ते 17 वयोगटातील लोकांना देण्यात आले आहेत. शिवाय दोन कोटी डोसेस बूस्टर डोस म्हणून देण्यात आले आहेत.

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७२ टक्क्यांवर

देशात मंगळवारी दिवसभरात २ हजार ८७६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ९८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ३ हजार ८८४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७२ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.३८ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.४४ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी २९ लाख ९८ हजार ९३८ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी २४ लाख ५० हजार ५५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ३२ हजार ८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १६ हजार ७२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८० कोटी ६० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. जवळपास ९७ कोटी नागरिकांना लसीचा पहिला, तर ८१ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून २ कोटींहून अधिक बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोागटातील नागरिकांना लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८२ कोटी ९७ लाख २४ हजार ५९० डोस पैकी १७ कोटी २५ लाख ३७ हजार ३७१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशात आतापर्यंत ७८ कोटी ५ लाख ६ हजार ९७४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ७ लाख ५२ हजार ८१८ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याचे आयसीएमआर कडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT