Latest

यवतमाळ : रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; भरपावसात दोन आदिवासी महिलांची रिक्षातच प्रसूती

अविनाश सुतार

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : सध्या सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असताना मारेगाव तालुक्यातील दोन आदिवासी महिलांनी भर पावसात बाळाला ऑटो रिक्षातच जन्म दिला. ही घटना १२ जुलैच्या रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कशी खिळखिळी झाली आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे.

आदिवासी कोलाम वस्ती असलेल्या रोहपट येथील चंदा (वय २५) या महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. याची माहिती आशा वर्करला देण्यात आली. आशा वर्करने रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयाशी मोबाईलद्वारे संपर्क केला. परंतु रुग्णवाहिका वेळेपर्यंत रोहपट येथे पोहोचलीच नाही. गरोदर महिलेला वेदना असह्य झाल्याने नाइलाजाने तिला भरपावसात ऑटोने मारेगावला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अर्ध्या वाटेतच खैरागावसमोर एका निर्जळस्थळी भर पावसात रात्री ८ वाजता चंदाने बाळाला जन्म दिला. अशा अवस्थेतच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरी घटना खैरागाव (भेदी) येथे घडली. वर्षा (वय २४) नामक महिला माहेरी बाळंतपणासाठी आली होती. १२ जुलैलाच याही महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या. गावातील आशा वर्करमार्फत आरोग्य यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली गेली. परंतु मुजोर आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. याही महिलेने वाटेतच ऑटोमध्ये बाळाला जन्म दिला. या महिला ऑटोने रुग्णालयात येत असताना आणि वेदनेने तडफडत असताना या गरोदर महिलेसोबत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नव्हता.
आशा वर्कर, परिचारिका यांच्या वेतनावर शासन लाखो रुपये खर्च करते. परंतु, हे कर्मचारी कधीही मुख्यालयी राहत नाहीत. वरिष्ठ अधिकारी मात्र या कर्मचाऱ्यांची कायम पाठराखण करतात. येथील रुग्णालयात सुसज्ज तीन रुग्णवाहिका उपलब्ध असताना गरोदर महिलांना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी. तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणी जनमानसातून होत आहे.

वेदनेने कळवळणाऱ्या गरोदर महिलेला हाकलून लावले

प्रसवकळा सुरू असताना १० जुलैरोजी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकेने साधा हातही न लावता हाकलून दिल्याची तक्रार गर्भवती महिलेचा पती प्रफुल सदाशिव आदे (रा. मारेगाव) याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. शेवटी आदे यांनी आपल्या पत्नीला खासगी वाहनाने यवतमाळ येथे सरकारी दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी त्या महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT