शिवसैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे | पुढारी

शिवसैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १५) भायखळा येथील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. काल येथील शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या गाडीवर हल्ला करण्याता आला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भायखळा येथे आले होते. दरम्यान, हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवून आणत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केले. या सरकारचे ते मुख्यमंत्री होत त्यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच जबरदस्त शॉक दिला. त्यानंतर शिवसेनेतले अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. सध्या ते मुंबईतील प्रत्येक शाखेत जाऊन पदाधिका-यांची भेट घेत आहेत. तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईतील भायखळामध्ये गुरुवारी रात्री दोघा शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला झाला. शिवसेना विभाग क्रमांक ११ मधील उपविभाग प्रमुख आणि भायखळा विधानसभा समन्वयकांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केली. तिघेजण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातून दोघे शिवसैनिक बालंबाल बचावले असल्याचे समजते. गुरुवारी रात्री साडे अकरा-बारा वाजवण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जातो आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील शिवसेनेच्या शाखेला भेट देऊन पधाधिका-यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. हल्ला झालेल्या शिवसैनिकांना पोलीस संरक्षण दिलं जावं. या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागता कामा नये. पोलिसांनी राजकारणात पडू नये. शिवसैनिकांच्या जिवावर येणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button