उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : लग्नसमारंभातील भांडणावरून टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उमरखेडमध्ये घडली. यामध्ये रघू डाबोडे (वय १८), सरु पथ्रोड (वय २४), विनोद धोतरे (वय २५) सर्व रा. नाग चौक, उमरखेड हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका लग्नसमारंभात किरकोळ कारणावरुन रघू, सरु, विनोद या तिघांचा टोळक्यातील काही जणांसोबत शाब्दीक वाद झाला होता. याचा बदला घेण्यासाठी टोळक्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास महागाव रस्त्यावरील राजस्थानी भवन समोर तिघांनाही टोळक्याने गाठून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस उपनिरिक्षक सुजाता बनसोड यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षात जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांची गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली होती. पण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा यवतमाळ पाठोपाठ उमरखेडमध्येही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरूणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वेळीच कडक कारवाई करूण गुन्हेगारी प्रवृत्तीला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचलंत का ?