बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सरकारी अधिकार्यांना फोनवरून धमकावून पैसे उकळणार्या तोतया एसीबी अधिकार्यांना सायबर क्राईम पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
मुरग्याप्पा निंगाप्पा पुजार (रा. सदलगा, ता. चिकोडी), राजेश चौगुले (शिरोळ, जि. कोल्हापूर), रजनीकांत (रा. सकलेशपूर, ता. हसन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येथील परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी इरण्णा रामण्णावर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीईएन पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वामध्ये सदर कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंडळाचे अधिकारी इरण्णा यांना अटक करण्यात आलेल्या तिघांनी आपण एसीबी अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध सरकारी खात्यातील अधिकार्यांकडे वसुली केली आहे.
या तिघांकडून आपण एसीबी अधिकारी असल्याचे सांगून अधिकार्यांना तुमच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. यावरून तुमच्या कार्यालय व घरावर एसीबी छापा टाकण्यात येईल. ही कारवाई चुकवायची असेल तर आपल्या बँक खात्यावर पैसे जमा करा, अशी धमकी देऊन अनेकांकडून पैसे उकळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.