Latest

Xiaomi India : शाओमी इंडियाच्या दोन अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस; ‘इतक्या’ हजार कोटींचा मागितला हिशोब

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Xiaomi India : ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) शाओमी इंडिया या मोबाईल निर्माता कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. ईडीकडून कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने नोटीसद्वारे 5,551 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा हिशोब मागितला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आणि संचालक समीर बी राव, माजी व्यवस्थापकीय संचालक (MD) मनु कुमार जैन यांना या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय ईडीने तीन विदेशी बँकांना देखील नोटीस पाठवली आहे. यामध्ये सिटी बँक, एचएसबीसी बँक आणि ड्यूश बँक एजीचा समावेश आहे. Xiaomi India

Xiaomi India : यापूर्वीही ईडीने मोठी कारवाई केली होती

FEMA प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली जाते आणि जेव्हा प्रकरण निकाली काढले जाते तेव्हा आरोपीला उल्लंघनाच्या तिप्पट रकमेपर्यंत दंड भरावा लागतो. तपास यंत्रणेने सांगितले की, Xiaomi सोबतच जैन आणि राव यांनाही ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात जमा केलेले 5,551.27 कोटी रुपये जप्त केले होते.

Xiaomi India : ईडीने दिली माहिती

शाओमी इंडियाला नोटीस पाठविल्याबाबत ईडीने शुक्रवारी याची अधिकृत माहिती दिली. ईडीने सांगितले की, Xiaomi India वर्ष 2015 पासून त्याच्या मूळ चायनीज कंपनीला पैसे पाठवत होते. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले आहे की Xiaomi इंडियाने 2014 पासून भारतात काम सुरू केल्याच्या एक वर्षानंतरच हे पैसे पाठवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT