Manu Kumar Jain : Xiaomi इंडियाचे माजी सीईओ म्हणतात, ‘मुलांना मोबाईल पासून...’ | पुढारी

Manu Kumar Jain : Xiaomi इंडियाचे माजी सीईओ म्हणतात, ‘मुलांना मोबाईल पासून...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल लहान मुलांना स्मार्टफोनची सवय लागली आहे. अनेक पालक देखील खूप आनंदी असतात आणि लोकांना सांगतात की त्यांची मुलं मोबाईल उघडतात, अॅप उघडून गाणी लावतात किंवा गेम खेळतात. हे स्मार्टनेसचे लक्षण आहे असे पालकांना वाटते. पण स्मार्टफोनचा तुमच्या मुलाच्या मनावर काय परिणाम होतोय याचा विचार करण्याची तसदी कोणी घेत नाही. सेपियन लॅब या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की लहान वयात मुलांना स्मार्टफोनची सवय लागल्याने प्रौढ झाल्यावर अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात. (Manu Kumar Jain)

याच संशोधनाला पाठिंबा देत मोबाईल फोन बनवणारी कंपनी Xiaomi इंडियाचे माजी सीईओ आणि जबॉन्गचे माजी सह-संस्थापक मनु कुमार जैन यांनीही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची विनंती पालकांना केली आहे. इतकंच नाही तर लहान मुलांच्या स्मार्टफोनच्या वापराविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या लोकांच्या यादीत मनू जैन यांचाही समावेश आहे. (Manu Kumar Jain)

मनू जैन यांनी शुक्रवारी (दि.१९) एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालकांनी मुलांना मोबाईल-टॅब्लेट देण्याच्या मानसिक परिणामांबद्दल बोलले पाहिजे. या संशोधनाचा रिपोर्ट शेअर करत मनु कुमार जैन यांनी पालकांसाठी सावधानतेचा इशारा आपल्या लेखातून दिला आहे. त्यांनी त्यांच्या लेखाची सुरुवातच “Stop giving smartphones to your kids’ अशी केली आहे. (Manu Kumar Jain)

सेपियन लॅबचा अहवाल शेअर करताना जैन यांनी लिहिले की, लहान वयात मुलांना मोबाईल आणि टॅब्लेट दिल्याने त्यांचे भविष्य खराब होत आहे आणि त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सॅपियन लॅबच्या अहवालानुसार, 60-70 टक्के महिला ज्या वयाच्या 10 वर्षापूर्वी स्मार्टफोनच्या संपर्कात होत्या त्यांना प्रौढ वयात मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 10 वर्षापूर्वी स्मार्टफोन वापरणाऱ्या 45 ते 50 टक्के पुरुषांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हणजेच लहान वयात मुलांना फोन देणे योग्य नाही. या सवयीमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे.

मोबाईल आणि टॅब्लेटचा मुलांच्या मेंदूवर होणाऱ्या घातक परिणामांबाबत अनेक संशोधने समोर आली आहेत. मुलांचे डॉक्टर विशेषत: पालकांना इशारा देतात की मुलांना मोबाईल किंवा टीव्हीचे व्यसन लावू नका. अनेक वेळा मुलांचे लक्ष विचलित करण्यासाठी पालक मुलांना टीव्ही किंवा मोबाईल देतात, त्यामुळे हळूहळू मुलांना मोबाईलची सवय लागते आणि भविष्यात ही सवय मुलांच्या मानसिक विकासात अडथळा ठरते.

अधिक वाचा :

Back to top button