Latest

महिला दिन विशेष : …अन् ‘तिने’ पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत

गणेश सोनवणे

नाशिक : नितीन रणशूर

'चूल आणि मूल' या चाकोरीत न राहता महिला वर्गाने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. पुरुषांची मक्तेदारी झालेले वाहन चालविण्याचे क्षेत्रही महिलांनी मोडीत काढले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक म्हणून महिलांना नियुक्ती मिळणार आहे. नाशिक विभागातील १५ महिला तब्बल ३८० दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून येत्या महिनाभरात लालपरीच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात लालपरीच्या सुरक्षित प्रवासाची हमी महिला चालकांवर राहणार आहे.

एसटी महामंडळाकडून सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविताना चालक कम वाहक पदासाठी महिलांचे अर्ज मागविले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लागला होता. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. नाशिक विभागातील १५ महिला उमेदवारांना ३०० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरासरी प्रतिदिन १० किलोमीटर याप्रमाणे प्रत्येक उमेदवारांचा ३,००० किलोमीटरपर्यंत वाहन चालविण्याचा सराव करून घेण्यात आला. दुहेरी स्टेअरिंग असलेल्या वाहनावर प्रशिक्षण पार पडले.

महिला चालक प्रशिक्षणार्थींच्या चालन कौशल्याच्या तपासणीसाठी प्रत्येक तीन महिन्यांनंतरच्या पहिल्या आठवड्यात चाचणी घेण्यात आली. विभागीय यंत्र अभियंता (चालन) व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थींचे चालन कौशल्य सुधारणासाठी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. महिला चालकांना उच्च दर्जाचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी वेळोवेळी यांत्रिकी, बिगरयांत्रिकी (वाहतूक) तसेच सॉफ्ट स्किल विषय शिकवण्यासाठी विभागीय नियंत्रकांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रशिक्षणार्थींना वर्कशॉपसह इतर आवश्यक माहिती देण्यात आली.

दरम्यान, सध्या महिला चालक उमेदवारांना ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. ८०० किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा सराव प्रशिक्षणार्थींकडून करवून घेतला जाणार आहे. तसेच त्यात वाहन देखभाल प्रात्यक्षिकांचाही अंतर्भाव असणार आहे. त्यानंतर त्यांना १५ दिवसांचे वाहकपदाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या प्रशिक्षणार्थींच्या हाती एसटीचे स्टेअरिंग सोपविण्यात येणार आहे.

असे झाले प्रशिक्षण (किलोमीटर)

-सर्वसाधारण व महामार्ग रस्ते (१०००)

-गर्दीचे ठिकाण असलेले रस्ते (५००)

-शहरी भागातील रस्ते (५००)

-घाट मार्गावरील रस्ते (५००)

-रात्रीचे वाहन चालन (५००)

कोरोनामुळे प्रशिक्षणाला दोन वर्षे विलंब झाला असून, आता प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. संसारासह लालपरी चालविण्याची दुहेरी कामगिरी आता पार पाडावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला चालक सज्ज झाल्या आहेत.

– माधवी साळवे, महिला चालक, एसटी महामंडळ, नाशिक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT