Big Well : ‘या’ ठिकाणी आहे राज्यातील सर्वात मोठी विहीर | पुढारी

Big Well : 'या' ठिकाणी आहे राज्यातील सर्वात मोठी विहीर

लिंगनूर; प्रवीण जगताप :  सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात सलगरे येथे अवघ्या दीड महिन्यात राज्यातील सर्वात मोठी विहीर ग्रामपंचायतीने खोदली आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गावातील पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे.(Big Well)

Big Well : गावाला पाणीटंचाई जाणवली नाही पाहिजे 

शासन नियमानुसार केवळ 18 मीटर व्यास व 12 मीटर खोलीची विहीर काढण्यास मंजुरी मिळू शकते. पण गावची 7000 लोकसंख्या व भविष्यातील वाढत जाणारी लोकसंख्या पाहता उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील यांनी सार्‍या गावाला पिढ्यान्पिढ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही पाहिजे, यासाठी 125 फूट रुंद, 95 फूट व्यास व 30 मीटर खोलीची विहीर खोदायचा चंग बांधला. शासकीय नियमांची काहीशी अडचण निर्माण झाली होती; पण म्हैसाळ योजनेचे पाणी आले नसल्याने गावातील सध्याच्या विहिरी आटू लागल्या. त्यामुळे पाण्याची टंचाई त्रस्त करू लागली. हे पाहून या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढावा म्हणून ग्रामपंचायत व वित्त आयोग निधी वापरून 38 लाख रुपयांची उपलब्धता केली.

वाढीव खोलीची मंजुरी जिल्हा परिषदस्तरावर कारणमीमांसा देऊन मंजूर करून घेतली. त्यामुळे 35 लाखांचा निधी मान्यता होईल. परंतु, व्यास व खोली दोन्ही अधिक असल्याने आता तो खोदाईचा खर्च 52 लाखांवर गेला आहे. लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन तरतूद सुरू ठेवली आहे. सध्या विहीर खोदाई पूर्ण केली आहे. काँक्रिट कठडा व बांधकामास किमान 48 लाख रुपयांचे अंदाजे बजेट आहे. जिल्हा परिषद स्तरावरून आमदार व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निदर्शनास केलेले प्रयत्न आणून देऊन काँक्रिट कामासाठी 25 लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सरपंच जयश्री पाटील यांच्यावतीने माजी सरपंच व सदस्य तानाजीराव पाटील यांनी दिली.

ही आहेत विहिरीची वैशिष्ट्ये

सध्या ही विहीर पूर्ण भरली आहे. 7.5 अश्वशक्तीचा विद्युत पंप 36 तास चालवून पाहिला असता फूटभर पाणीही कमी झाले नाही. विहिरीला मोठे झरे लागले आहेत. हे मोठे काम 3 पोकलेन, 2 बोर ब्लास्टिंग मशिनच्या साहाय्याने अवघ्या 45 दिवसांत पूर्ण झाले आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेली सर्वात मोठी विहीर ठरली आहे.

हेही वाचा

Back to top button