मालवण; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेला सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वायरी भूतनाथ गावच्या हद्दीत वसला आहे. सिंधुदुर्ग किल्ला आमचा मानबिंदू असून हा किल्ला जर कुणी मालवण शहरात वर्ग करण्याचा घाट घालत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. वेळ पडल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन उभे केले जाईल. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत सिंधुदुर्ग किल्यासाठी आम्ही लढत राहू असा एकमुखी निर्धार वायरी भूतनाथ गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत याचा निषेध नोंदविण्यात आला.
मालवण दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते ब्रिगेडियर कर्नल सुधीर सावंत यांनी मंगळवारी (दि.२९) येथे पत्रकार परिषद घेत किल्ले सिंधुदुर्ग हा मालवण पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी मुख्यमंत्री तसेच पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेस शेकडो ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते. कर्नल सावंत यांच्या वक्तव्याचा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर, मनोज लुडबे, भाई मांजरेकर, जयवंत लुडबे, विश्वास लुडबे, कृष्णा देऊलकर, संतोष लुडबे, महेश लोकेगावकर, बबन गावकर, प्रदीप वेंगुर्लेकर, भालचंद्र केळुसकर, मिलिंद झाड, संजय लुडबे, मंदार लुडबे, दादा वेंगुर्लेकर, तलाठी वसंत राठोड, संदीप बोडवे, संदेश तळगावकर, तेजेस लुडबे, ममता तळगावकर, दिलीप घारे, सुभाष पाटकर, दाजी जोशी, चंदू प्रभू यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी कर्नल सुधीर सावंत यांचा निषेध करताना किल्ले सिंधुदुर्ग अन्य कोणाच्याही ताब्यात जाऊ देणार नाही, असा ठराव करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री, पुरातत्त्व विभाग, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांना पाठवून देण्याचे ठरविण्यात आले. हरी खोबरेकर म्हणाले, किल्ले सिंधुदुर्ग आणि वायरी भूतनाथ यांचे अजोड नाते तोडण्याचे वक्तव्य काल कर्नल सुधीर सावंत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत.
मनोज लुडबे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी आणि निधीचा पाठपुरावा करण्यासाठी, तसेच किल्यावर सोयी सुविधा पुरविण्यासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत कटिबध्द असून राजकीय मंडळींनी किल्याच्या हस्थांतरणा बाबत बेताल वक्तव्ये करू नयेत. कृष्णा देऊलकर यांनी जोपर्यंत किल्ले सिंधुदुर्ग, त्यातील जनता, वायरी भूतनाथ ग्रामस्थ एकत्र आहेत तोपर्यंत तुमचे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला.
अधिक वाचा