खासदार गिरीश बापट अनंतात विलीन; पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप | पुढारी

खासदार गिरीश बापट अनंतात विलीन; पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप

पुढारी ऑनलाईन: पुण्याचे खासदार गिरीश बापट अनंतात विलिन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. बापट यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील लोकांबरोबर पुणेकरांनी साश्रु नयनांनी बापटांना निरोप दिला.

खासदार गिरीश बापट हे गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तीन टर्म नगरसेवक, पाच टर्म आमदार आणि 2019 पासून खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असूनही खासदार गिरीश बापट हे कसबा पेठ पोटनिवडणुकीत व्हीलचेअरवर बसून भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले होते. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला होता. त्यावेळी त्यांनी केलेलं भावनिक आवाहन ऐकून अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

पुण्यातील शनिवार पेठेत बापट यांचे घर आहे. या घराच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘गिरीश बापट अमर रहे’, अशा घोषणा कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी देत आहे. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी गिरीजा, मुलगा गौरव आणि सून स्वरदा आणि नात असा परिवार आहे.

 

Back to top button