Supreme Court : पालघर येथील साधूंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाची हरकत नाही | पुढारी

Supreme Court : पालघर येथील साधूंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाची हरकत नाही

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Supreme Court : पालघर येथील साधूंच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असेल तर त्याला आपली हरकत राहणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी सांगण्यात आले. यासंदर्भात पुढील सुनावणीपूर्वी म्हणजे 14 एप्रिलच्या आधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 रोजी तीन साधूंची जमावाने हत्या केली होती. कोरोना संकट काळात लॉकडाउन असताना ही हत्या झाली होती. त्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारला त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने धारेवर धरले होते. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सदर प्रकरणाचा तपास करायची तुमची तयारी आहे का? असा सवाल सीबीआयला केला. यावर तपासाची आपली तयारी असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

साधूंच्या हत्येबाबतचे प्रकरण पालघर पोलिसांकडून राज्याच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी असंख्य लोकांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. राज्यात सत्ता बदल झाल्यावर नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती.

Back to top button