पुढारी ऑनलाईन डेस्क : वायू प्रदूषणामुळे जेरीस आलेल्या दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. दिल्ली सरकारने शाळांना आता हिवाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या शिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे. प्रदूषणाची वाढती पातळी पाहता यंदा हिवाळ्याची सुट्टी आधी घेतली जात आहे. यापूर्वी दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, संपूर्ण दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत आहे. बुधवारी सकाळी आनंद विहारमध्ये ४५२, आरके पुरममध्ये ४३३, ओखलामध्ये ४२६, पंजाबी बागेत ४६०, श्री अरबिंदो मार्गमध्ये ३८२, शादीपूरमध्ये ४१३ आणि आयटीओमध्ये ४१३ एक्यूआय नोंदवण्यात आले.
प्रदूषणाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय आज ( दि. ८) सर्व संबंधित विभागांची बैठक घेणार आहेत. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता कॅनॉट प्लेसमध्ये 'स्मॉग टॉवर' कार्यान्वित करण्यात आला आहे.
शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, 13 नोव्हेंबरपर्यंत सकाळी धुके असू शकते. तसेच, 10 नोव्हेंबर रोजी हवामानाच्या दिशा बदलल्यामुळे काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस पडू शकतो.
हेही वाचा :