नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे चिंताग्रस्त आप सरकारने 1 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात डिझेलवरील बसगाड्यांचा प्रवेश रोखला आहे. केवळ इलेक्ट्रिक, सीएनजी आणि भारत स्टेज (बीएस-6) श्रेणीच्या गाड्यांनाच दिल्लीत प्रवेश मिळेल. (delhi Air Pollution)
त्याचप्रमाणे, वाहतूक सिग्नलवर इंधन जळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 2 नोव्हेंबरला दिल्लीत सर्व विधानसभा क्षेत्रांत रेडलाईट ऑन, गाडी ऑफ (लालदिवा सुरू गाडी बंद) ही जागरूकता मोहीम राबविली जाणार आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली. मागील वर्षी 29 ऑक्टोबरला दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 397 होता. सरकारच्या सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे यंदाच्या 29 ऑक्टोबरला त्यात 325 अशी सुधारणा झाली आहे. हा बदल सकारात्मक असला तरी त्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. सध्या गाड्यांमुळे होणारे प्रदूषण वाढत आहे. दिल्लीत लक्षावधी वाहनचालक दहा ते पंधरा चौकांमध्ये वाहतूक सिग्नलवर वाहने सुरू ठेवून दररोज जवळपास अर्धा तास इंधन जाळतात. त्यातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीत दोन ते तीन ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अधिक असून तेथे प्रदूषण रोखण्यासाठी त्या भागातील पथके काम करत आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषण वाढविणारे इंधन वापरले जाऊ नये, यावरही लक्ष ठेवले जात असल्याचे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.