Latest

श्रीलंका क्रिकेटचा सुवर्णकाळ परतणार?

backup backup

क्रिकेट विश्वचषकाच्या थेट प्रवेशासाठी पहिल्या आठ संघांचे रँकिंग ग्राह्य धरले गेले आणि वेस्ट इंडिज, श्रीलंकासारख्या माजी विश्वविजेत्यांना विश्वचषकाची पात्रता फेरी खेळायला लागली. आशिया चषकाच्या निमित्ताने श्रीलंकेने ही रँकिंग पद्धत कशी चुकीची आहे, हे जणूकाही सिद्ध विडा उचलला आहे. आपल्या गटात बांगला देश आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यावर सुपर-4 मध्ये भारताच्या तोंडचे वेल्लालागेने पाणी पळवले होते. भारताने सामना जिंकला तरी वेल्लालागे सामनावीर होता, यातच त्याची कमाल दिसून येते. या सर्वांवर कडी केली ती परवाच्या श्रीलंकेच्या पाकिस्तानवरच्या विजयाने. आशिया चषकाचा हा सामना उपांत्य सामना होता. भारत-पाकिस्तान लढत तिसर्‍यांदा व्हायची शक्यता श्रीलंकेने धुळीला मिळवली आणि आपल्या द़ृष्टीने पाकिस्तानचा काटाही परस्पर काढला.

संबंधित बातम्या : 

शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या थरारात विशेष जाणवणार्‍या गोष्टी म्हणजे, श्रीलंका संघातील अष्टपैलू खेळाडूंचा विजयातला वाटा आणि योग्य प्रसंगी आपला खेळ उंचावत संघाला विजयापर्यंत नेणारे त्यांचे मॅचविनर. हा सामना समजून घ्यायला आपल्याला पहिल्यांदा 'डकवर्थ ल्युईस'ची कमालही समजून घ्यावी लागेल. पाकिस्तानने 42 षटकांत 7 बाद 252 केल्या आणि श्रीलंकेनेही 42 षटकांत 8 बाद 252 केल्या, तरी श्रीलंका सामना जिंकली, हे कसे पहिले समजावून घेऊया. हा सामना पन्नास षटकांचा असता, तर तो टाय म्हणून घोषित केला असता; पण पावसामुळे पन्नास षटकांचा सामना चालू व्हायच्या आधीच 45 षटकांचा झाला. सामना चालू झाला आणि पावसाचा पुन्हा व्यत्यय आला तेव्हा पाकिस्तान 27.4 षटकांत 5 बाद 130 होते. इथे डकवर्थ लुईस नियम लागला आणि सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा तो 42 षटकांचा केला गेला. पाकिस्तानने जेव्हा नियोजित 42 षटकांत 7 बाद 252 धावा केल्या तेव्हा 'डकवर्थ ल्युईस'प्रमाणे श्रीलंकेच्या टार्गेटमधून 1 धाव कमी झाली म्हणजेच श्रीलंकेसाठी पाकिस्तानची धावसंख्या 251 होऊन टार्गेट 252 झाले. डकवर्थ लुईस नियमात पावसाच्या व्यत्ययाच्या आधी जितके बळी जातात ते प्रतिस्पर्ध्याचे टार्गेट निश्चित करायला वापरले जाते. मोहम्मद नवाझ पावसाच्या व्यत्ययाच्या आधीच्या चेंडूवर बाद झाला नसता, तर श्रीलंकेला टार्गेट 255 झाले असते.

पाकिस्तानचा संघ जो या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात समतोल होता त्या संघाला अचानक दुखापतींना सामोरे जावे लागले. हॅरिस रौफ आणि नसीम शाह या त्यांच्या जलदगती मार्‍याच्या त्रिकुटातील दोघांना दुखापत झाल्याने पाकिस्तानी गोलंदाजीची लय सामन्याआधीच बिघडली होती. सलामीवीर फकर झमान फॉर्ममध्ये नाही. यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानला सामन्याच्या आदल्या दिवशी एक दोन नाही, तर चक्क पाच बदल करावे लागले. यात पुन्हा इमान-उल-हक आणि सौद शकील या बदली खेळाडूंच्या दुखापतीने सामन्याच्या काही मिनिटे आधी संघ पुन्हा बदलला. इतके बदल केल्याने कुठच्याही संघाचा बॅलन्स हा निघून जातो. याचमुळे 'आयसीसी'च्या क्रमवारीत अव्वल असलेल्या पाकिस्तानविरुद्ध क्रमवारीत आठवे असलेले आणि आपले गेले सलग 13 सामने जिंकणारे श्रीलंकाच या सामन्याला फेव्हरिट होते. श्रीलंकेचा संघ संक्रमणातून जात असताना त्यांच्या रँकिंगवर झालेला परिणाम म्हणून त्यांना विश्वचषकाची पात्रता फेरी खेळावी लागली; पण आता हा संघ मोठ्या संघांना टक्कर द्यायला तयार आहे. प्रमोद मदुशानचा यॉर्कर फॉर्ममध्ये नसलेल्या फखर झमानचा बचाव भेदून गेला आणि पाकिस्तानच्या डावाला पहिले खिंडार पडले. शफिक आणि बाबर आझमने पाकिस्तानचा डाव सावरला; पण श्रीलंकेचा नवीन हिरा वेल्लालागे पुन्हा श्रीलंकेच्या मदतीला धावून आला.

भारताचे टॉप चार फलंदाज बाद करणार्‍या या गुणी गोलंदाजाने बाबरसारख्याला फसवले. एकाच टप्प्यावर पहिला चेंडू आत वळणारा होता, तर पुढच्यावर बाबरला त्याचा फ्रंटफूट डिफेन्स फसवून पुढे खेचले आणि यष्टिरक्षक मेंडिसने क्षणर्धात आपले काम उरकले. कुसल मेंडिसने पुढे फलंदाजीत कमाल केलीच, पण केवळ या बाबरच्या स्टंपिंगसाठी त्याला सामनावीर करायला हरकत नव्हती. पावसापर्यंत 5 बाद 130 झाल्यावर श्रीलंकेचे सामन्यावर वर्चस्व दिसत होते; पण रिझवान आणि इफ्तेकार अहमद यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानने डावाला आकार दिला. श्रीलंकेचा संघ पाठलाग करताना कुसल परेरा हकनाक धावबाद झाला, पण कुसल मेंडिसने डावाची सूत्रे हातात घेतली. प्रथम निसांका आणि मग समरविक्रमाच्या साथीने त्याने जेव्हा डावाची अर्धी षटके झाली तेव्हा टार्गेटही बरोबर अर्ध्यावर आणून ठेवले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजीत मधली षटके टाकणारे फिरकी गोलंदाज या सामन्यात प्रभावी नव्हते शादाब महागडा ठरला, तर इफ्तेकार अहमदने बळी मिळवले पण धावाही तितक्याच दिल्या. मेंडिस बाद झाला तेव्हा श्रीलंकेला चाळीस चेंडूंत 41 धावा हव्या होत्या.

आजच्या जमान्यात ते सहज शक्य होते, पण श्रीलंकेचा डाव गडगडला. इथेच असलंकाचे अष्टपैलू गुण कामाला आले. मेंडिसने विजय द़ृष्टिक्षेपात आणला होता; पण तो मिळवायला प्रयत्नांची गाडी शेवटपर्यंत खेचायला कुणीतरी लागते ते असलंकाने केले. या रविवारी 'आशिया'चा राजा कोण हे ठरेल; पण श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या कामगिरीने त्यांनी बाकीच्या क्रिकेट जगातला विश्वचषकासाठी त्यांना पात्रता फेरीतून आलेला संघ न म्हणता माजी विश्वचषक विजेते म्हणून बघितले पाहिजे, हेच दाखवून दिले आहे. लंकेत सोन्याच्या विटा होत्या की माहित नाही, पण श्रीलंका क्रिकेटला पुन्हा सोनेरी सुवर्णकाळ मिळवून देऊ शकतील इतके गुणी खेळाडू या संघात आहेत, हे मात्र या सामन्याने अधोरेखित केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT