Jadeja 200 ODI Wickets : रवींद्र जडेजाने पूर्ण केले बळींचे ‘द्विशतक’!
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja 200 ODI Wickets : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आपल्या 182 व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात एक विशेष टप्पा गाठला आहे. बांगलादेश विरुद्ध आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील सामन्यात शमीम हुसेनची विकेट घेताच जडेजाने वनडे करिअरमधील 200 बळींचा टप्पा गाठला. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर तो अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे.
बांगलादेशला 35व्या षटकात 161 धावांवर सहावा धक्का बसला. रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला एक धाव करता आली. या विकेटसह जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे (337), जवागल श्रीनाथ (315), अजित आगरकर (288), झहीर खान (282), हरभजन सिंग (269) आणि कपिल देव (253) यांनी ही कामगिरी केली आहे. (Ravindra Jadeja 200 ODI Wickets)
जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय विकेट घेतल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याने 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.88 च्या सरासरीने आणि 4.90 च्या इकॉनॉमी रेटने 44 बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 36 धावांत 5 बळी. जडेजाची वनडेतील दुसरी चांगली कामगिरी इंग्लंड क्रिकेटविरुद्ध आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या 25 सामन्यात 38 बळी घेतले आहेत.
रवींद्र जडेजाची सर्वोत्तम एकदिवसीय आकडेवारी (Ravindra Jadeja 200 ODI Wickets)
रवींद्र जडेजाने आतापर्यंत 182 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.9 च्या इकॉनॉमीसह 200 बळी घेतले आहेत. श्रीलंकेचा माजी गोलंदाज नुवान कुलसेकरा आणि वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्हो यांच्या नावावर 199-199 विकेट आहेत. म्हणजेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जडेजा या दोघांच्याही पुढे गेला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्याने एक फलंदाज म्हणून 2000 हून अधिक धावाही केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा तो कपिल देव नंतर दुसरा भारतीय गोलंदाज आहे. कपिल देव यांनी वनडेत 253 विकेट आणि 3783 धावा केल्या होत्या.

