कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क
आम्ही अभ्यास सुरू केला आहे. प्रत्येक बूथवरून आम्हाला माहिती येत आहे. कोल्हापूर शहरातून मतदार यादीतून नावं गायब झाली आहेत, त्यावर अभ्यास करणार आहोत. पण यातून आम्हाला भाजपची ताकद वाढलेली दिसून येतेय. आम्ही आता २०२४ ची तयारी करू तेव्हा बघू, अशी प्रतिक्रिया भाजपचे कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार सत्यजित (नाना) कदम यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या महिला उमेदवार जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते पडली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते पडली आहेत.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी (Kolhapur North Bypoll election) झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी विजयानंतर दिली आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा (Kolhapur North Bypoll election) रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. या निवडणुकीकडे काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते. जाधव यांच्या विजयामुळे सतेज पाटील यांची सरशी झाली आहे, तर होम टर्फवरच भाजपच्या उमदेवाराचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांची मात्र पिछेहाट झालेली आहे.