गृहिणी ते ‘काेल्‍हापूर उत्तर’च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव… | पुढारी

गृहिणी ते 'काेल्‍हापूर उत्तर'च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सहा महिन्यांपूर्वी त्या गृहिणी होत्या. आमदार असलेल्या पतीला भक्कम साथ देत कुटुंबाची जबाबदारी त्‍या पार पाडत हाेत्‍या; पण  ३ डिसेंबर २०२१ या दिवसाने सारं काही बदललं. पती चंद्रकांत जाधव यांचे निधन झालं.  डाेंगराएवढे दु:ख पचवत  त्‍या काही महिन्‍यातच पाेटनिवडणुकीला सामाेरे गेल्‍या. राज्‍यात चर्चेचा विषय ठरलेल्‍या या निवडणुकीत अखेर त्या‍ंनी बाजी मारली. काेल्‍हापूर उत्तर मतदारसंघाच्‍या पहिल्‍या महिला आमदार हाेण्‍याचा बहुमान जयश्री चंद्रकांत जाधव यांना मिळाला आहे.

गृहिणी ते नगरसेविका

जयश्री जाधव यांचा जन्‍म  २६ जून १९६५ रोजी आजरा  येथे झाला. वडील शंकरराव मोरे हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण आजऱ्यात पूर्ण  केले.  पंचवीस माणसांच्‍या एकत्रीत कुटुंबातील त्‍या माेठ्या सून झाल्‍या.  घरात माणसांचा राबता असायचा. पती चंद्रकांत जाधव आणि दीर संभाजी जाधव यांची  फौंड्री उद्योगात भरारी घेतली. सामाजिक कार्यातून कुटुंबाचा जनसंपर्क वाढू लागला. जयश्री जाधव यांनी प्रभाग क्रमांक ६३ सम्राटनगरमधून महापालिका निवडणूक लढवली. त्‍या नगरसेविका झाल्‍या.

चंद्रकांत जाधव यांनी २०१९ मध्‍ये विधानसभा निवडणूक लढवली. मोठ्या उद्योग समूहाचे मालक असूनही जाधव यांची राहणी अगदी साधी होती. तालीम संस्था, गणेश मंडळे, शहरातील विविध पेठा यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क, जिल्ह्यातील गरजूंच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. ते आमदार झाले;  पण ३ डिसेंबर २०२१ च्या घटनेने सर्व काही बदलून गेले. कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. पतीच्‍या निधनाचे दु:ख पचवत जयश्री जाधव निवडणूक रिंगणात उतरल्‍या.

जिल्ह्यासह पूर्ण राज्याची लक्ष वेधणारी निवडणूक 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली.  या निवडणुकीत एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजप पक्षाचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्यात  चुरशीची लढत राज्‍यात चर्चेचा विषय ठरली.

अखेर जयश्री जाधव यांनी मारली बाजी

उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत अखेर  श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघातील त्‍या पहिल्‍या महिला आमदार ठरल्‍या आहेत.  एकंदरीत ही निवडणुक  राजकीय समीकरणे बदलवणारी ठरणार हाेती. यामुळे  जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली हाेती. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या यातून निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. 

अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या स्‍वाभिमानी जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. आता त्‍यांचे काेल्‍हापूरच्‍या विकासाचे  स्‍वप्‍न पूर्ण  करायचे आहे.

श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव

Back to top button