Latest

यशस्वी शस्त्रक्रिया! मेंदूतील पाणी नळी टाकून आणले पोटात, बालक ठणठणीत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मेंदूत अनावश्यक पाणी जमा झालेल्या 12 वर्षांच्या मुलावर शस्त्रक्रिया करून ते पाणी अंतर्गत नळी टाकून पोटातून काढण्याची शस्त्रक्रिया ससून रुग्णालयातील मेंदूविकार विभागातील डॉक्टरांनी यशस्वी केली आहे. आता तो मुलगा बरा झाला असून, रुग्णालयाचे मेंदूविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय व्होरा पथकाने ही शस्त्रक्रिया केली.

बारा वर्षांच्या प्रथमेशला दहा महिन्यांपूर्वी अचानक चक्कर यायला लागली व तोलही जायला लागला. तसेच संडास व लघवीवरचेही नियंत्रण सुटले. मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील प्रथमेशला लातूरच्या प्रथमेश हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. तेथे मेंदूची एमआरआय तपासणी केल्यावर आढळले की, त्याच्या मेंदूत पाणी (हायड्रोसिफलिस) झालेले आहे. तेथील डॉक्टरांनी त्याच्या मेंदूतील पाणी काढण्यासाठी मेंदूपासून पोटापर्यंत अंतर्गत नळी टाकण्याची (व्ही.पी. शंट) शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला बरे वाटायला लागले.

यानंतर प्रथमेशला पुन्हा ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीचाच त्रास होऊ लागला. पूर्वीच्या रुग्णालयात तपासणी केल्यावर डॉक्टरांना आढळले की, मेंदूत जी नळी टाकलेली आहे, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाणी ओढले जात असून, त्यामुळे हा त्रास होत आहे. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात रेफर केले.

ससूनमध्ये यशस्वी उपचार

ससून रुग्णालयाचे मेंदूविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय व्होरा यांनी त्याचे मेंदूचे सीटीस्कॅन केले आणि गोळ्या औषधे देऊन परत एक महिन्यांनी यायला सांगितले. मात्र, त्रास कमी न झाल्याने डॉक्टरांनी त्याची मेंदूत बसवलेली साधारण नळी काढून मेंदूतून गरजेइतकेच पाणी ओढणारी नियंत्रित (प्रोग्रामेबल व्ही. पी. शंट) नळी टाकली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो मुलगा पूर्वीप्रमाणे चांगला झाला आहे. ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, डॉ. संजय व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मच्छिंद्र निलंगे, डॉ. आनंद काटकर, डॉ. अंकुश वानखेडे यांनी केली.

''मेंदूमध्ये पाणी तयार होत असते व अतिरिक्त झाल्यास निचरा होण्यासाठी शरीराची रचना असते. मात्र, अनेकवेळा या रचनेत बिघाड झाला, संसर्ग झाला, जन्मजात दोष झाला, तर मेंदूत अनावश्यक पाणी जमा होऊन त्यामुळे विविध दोष तयार होतात. अभिषेकला नियंत्रित व्ही.पी. शंट बसवल्याने त्याचा त्रास दूर झाला आहे, असे दोष टाळण्यासाठी महिलांनी गर्भधारणेपूर्वी तसेच गर्भधारणेदरम्यान महिलांनी फॉलिक अ‍ॅसिड व योग्य त्या जीवनसत्वांचे सेवन करावे.''

                                                                                                 – डॉ. अंकुश वानखेडे, मेंदूविकार विभाग, ससून रुग्णालय.

SCROLL FOR NEXT