Latest

डायबिटीज  नियंत्रणात ठेवायचाय? मग, वाचा ICMR ने दिलेल्या ‘या’ टीप्स

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात दिवसेंदिवस डायबिटीज ( मधुमेह) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ' ( ICMR ) या संस्थेने डायबिटीजवरील नवीन अभ्यासात डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टीप्स सांगितल्या आहेत. जाणून घेवूया या टीप्‍स काय आहेत ते…

डायबिटीज आणि प्री-डायबेटिज नियंत्रित करण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेटचे सेवन 50 ते 55 टक्क्यांनी तर प्रोटीनचे सेवन 20 टक्के अधिक केले पाहिजे.जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा डायबिटीजची समस्या उद्भवते. हे संतुलित करण्यासाठी स्वादुपिंड 'इन्सुलिन' नावाचे हार्मोन स्त्रवते. इन्सुलिन ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते; पण जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन योग्य प्रकारे स्त्रवले जात नाही, तेव्हा डायबिटीजच्या समस्येला सामोरे जावे लागते. डायबिटीजचे टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करू शकत नाही. तर दुसऱ्या प्रकारात स्वादुपिंडमधून खूप कमी प्रमाणात इन्सुलिन तयार कले जाते.

डायबिटीज होण्यापूर्वीच्या स्थितीला प्री-डायबिटिक म्हटले जाते. डायबिटीजवर सुरू असलेल्या अभ्यासानुसार, जर तुम्ही प्री-डायबिटीक असाल, तर भात आणि रोटी खाऊ नका, तसेच तुमच्या शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवा. यामुळे टाइप 2 डायबिटीजच्या जोखमीपासून मुक्त होऊ शकता.  तसेच अभ्यासावरून असेही सांगण्यात आले आहे की, कार्बोहायड्रेटचे प्रमाण ५० ते ५५ टक्क्यांनी कमी करून आणि आहारातील २० टक्के प्रथिनांचे प्रमाण वाढवून डायबिटीज आणि प्री-डायबिटीजची समस्या टाळता येते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया डायबिटीजचा हा नवीन अभ्यास सुमारे १८ हजार ९० व्यक्तींच्या आहारात समाविष्ट असलेल्या पोषक तत्वांच्या विश्लेषणावर आधारित आहे.

डायबिटीजवर डाइट हेच सर्वोत्तम औषध

भारतात डायबिटीजची समस्या झपाट्याने वाढत आहे. सध्या भारतात सुमारे ७.४ कोटी नागरीक डायबिटीजच्या समस्येने त्रस्त आहेत. 8 कोटी लोक प्री-डायबेटीजने त्रस्त असून प्री-डायबिटीजपासून डायबिटीजमध्ये रूपांतरित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डायबिटीजवरील अभ्यासाचे लेखक डॉ. व्ही. मोहन यांनी 2045 मध्ये भारतात एकूण 13.5 कोटी डायबिटीजचे रुग्ण असतील असे म्हटलं आहे . येत्या 20 वर्षांत डायबिटीज रुग्णांची संख्या दुप्पट होईल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त कार्बोहाइड्रेटयुक्त आहार घेणे. आपल्या एकूण उष्मांकांपैकी सुमारे 60 ते 75 टक्के कॅलरी कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात असते आणि फक्त 10 टक्के प्रोटीन असते. पांढर्‍या तांदळाचे जास्त सेवन केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो हे यापूर्वी अनेक अभ्यासांतून दाखवले आहे. एखाद्या व्यक्तीने कार्बोहायड्रेटचे प्रमाण 50 ते 55 टक्क्यांनी कमी केले आणि प्रोटीनचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढवले ​​तर डायबिटीजपासून मुक्ती मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

असा घ्या आहार

डायबिटीजवर  नियंत्रण मिळविण्यासाठी आहारामध्ये 49 ते 54 टक्के कर्बोदके, 19 ते 20 टक्के प्रथिने, 21 ते 26 टक्के चरबीचे तसेच फायबरचे 5 ते 6 टक्के प्रमाण असावे.  स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत कार्बोहायड्रेट सेवन दोन टक्क्यांनी कमी केले पाहिजे. त्याचप्रमाणे वृद्धांनी कार्बोहायड्रेटचे सेवन 1 टक्‍क्‍यांनी कमी करावे आणि प्रथिनांचे सेवन तरुणांपेक्षा 1 टक्‍क्‍यांनी अधिक करावे. त्याचबरोबर प्री-डायबिटीजच्या रूग्णांनी कर्बोदकांचे प्रमाण 50 ते 56 टक्के, प्रथिने 10 ते 20 टक्के, चरबी 21 ते 27 टक्के आणि आहारातील फायबर 3 ते 5 टक्के असावे. त्याचबरोबर, अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की, जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाहीत त्यांनी 4 टक्के कमी कार्बोहायड्रेट्सचे सेवन करावे.

कसा असावा संतुलित आहार

संतुलित आहाराबात डॉ.मोहन यांनी सांगितले की, ताटातील अर्धी जागा भाजीसाठी असावी, ज्यामध्ये हिरव्या भाज्या, फरसबी, कोबी, फुलकोबी असावे. बटाट्यासारखे जास्त पिष्टमय पदार्थ खाऊ नयेत. मासे, चिकन आणि सोया सारखे प्रथिनयुक्त पदार्थ असावेत. तसेच ताटात थोडा भात आणि दोन चपात्या असाव्यात.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT