अ‍ॅलर्जी कशामुळे होते? यावर ‘हे’ आहेत उपाय | पुढारी

अ‍ॅलर्जी कशामुळे होते? यावर 'हे' आहेत उपाय

एखादा पदार्थाची अ‍ॅलर्जी येणे म्हणजे शरीरात काहीतरी विपरीत होणे. अ‍ॅलर्जी सहसा प्रथिनांना किंवा प्रथिनांच्या तुकड्यांना होते. घरातील धूळ, हवेतील परागकण, अन्‍नपदार्थातील कृत्रिम रंग, प्रिझर्व्हेटिव्ह हे सर्व सामान्यपणे अलॅर्जी निर्माण करतात. सर्वसाधारणपणे त्वचेवर पुरळ, खाज, गाठी येणे असे होते किंवा शिंका, नाक गळणे, श्‍वास घ्यायला त्रास, दमा अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे अचानक (नेहमीच्या) औषधाला/पदार्थाला/हेअरडाय/क्रीम वगैरेंनी येऊ शकतात. अ‍ॅलर्जी टेस्ट करण्याची पद्धत : वेगवेगळी ‘अ‍ॅलर्जी’ ज्यापासून होऊ शकते, अशा पदाथार्र्ंची औषधे ‘किट’च्या रूपाने मिळतात.

1. त्वचेत इंजेक्शन : पूर्वी ज्या व्यक्‍तीला टेस्ट करायचे आहे, त्या व्यक्‍तीच्या त्वचेच्या वरच्या भागात सूक्ष्म प्रमाणात ज्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असण्याची शंका आहे, त्या पदार्थाचा अर्क इंजेक्शनद्वारे दिला जाई. त्यानंतर त्या जागेवर सूज, लालपणा, खाज वगैरे येते का, ते थोड्या वेळानंतर बघितले जाई.

2. ‘प्रिक’ टेस्ट : ही तपासणी सर्वसामान्यपणे वापरली जाते. यात दुखण्याचे प्रमाण अगदी कमी असते. याला सुमारे 1 हजार खर्च येतो.
आधी पेशंटची सविस्तर माहिती घेतली जाते.कुटुंबात कुणाला अ‍ॅलर्जी आहे का, त्रास कधी होतो, कशामुळे होत असावा, कुठे (शेतात, कामाच्या ठिकाणी) इत्यादी.

* जर एव्हिल, सेट्रिझिनसारखे औषध सुरू असेल, तर ते तपासणीच्या 3 दिवस आधीपासून बंद केले जाते. * रुग्णाचे दोन्हीही हात स्पिरीटने स्वच्छ केले जातात. रांगोळीच्या ठिपक्यासारखे 70-80 वेगवेळ्या अ‍ॅलर्जी उत्पन्‍न करू शकणार्‍या पदार्थांच्या अर्कांचे थेंब (हे रेडिमेड मिळतात) हातावर मांडले जातात. 26 नंबरच्या बारीक सुईने प्रत्येक थेंबामधून त्वचेवर टोचले जाते. त्यामुळे सूक्ष्म प्रमाणात ते द्रव्य त्वचेत जाते. अर्ध्या तासाने परिणाम तपासला जातो.

3. रक्‍ताची चाचणी (स्पेसिफिक आयजीई) ः ही चाचणी नवीन आहे. अत्यंत उपयुक्‍त आहे. सुमारे साडेतीन-चार हजार खर्च येतो. 4. प्रोव्होकेशन टेस्ट ः समजा एखाद्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे, अशी शंका असली, तर डॉक्टरांच्या देखरेखीखाली सूक्ष्म प्रमाणात ते औषध देऊन त्यामुळे काही त्रास होतो का, हे पाहिले जाते.

5. कामाच्या ठिकाणच्या वातावरणात असलेल्या पदार्थांची अ‍ॅलर्जी ः दोन दिवस त्या व्यक्‍तीने कामावर जायचे नाही. सकाळी ‘स्पायरोमेट्री’ केली जाते. ज्यामुळे श्‍वासाच्या विविध पैलूंबाबत माहिती येते. उदा. किती हवा आत ओढली जाते, किती बाहेर सोडली जाते, काय वेगाने सोडली जाते इत्यादी. * ज्या पावडरमुळे (उदा. कारखान्यात औषधांच्या पावडरचा धुराळा) त्रास होतो, अशी शंका असते, ती 15-20 ग्रॅम पावडर एका कागदावरून दुसर्‍या कागदावर, परत आधीच्या कागदावर असे 8-10 वेळेस केले जाते. त्यामुळे ती पावडर हवेत हलका धुराळा करते. अर्ध्या तासानंतर परत स्पायरोमेट्री केली जाते. आधीच्या मानाने जर नंतरच्या स्पायरोमेट्रीमध्ये 20 टक्क्यांहून अधिक कमतरता आढळली, तर त्या पावडरची अ‍ॅलर्जी असावी असे समजले जाते.

* जर एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असल्याचे कळले, तर शक्य असल्यास तो पदार्थ टाळावा. हवेतील पराग, हाऊस डस्ट माईट (धुळीतील सूक्ष्म कीटक) वगैरेंची तीव्र अ‍ॅलर्जी असेल, तर इंजेक्शनचा कोर्स करता येतो. यासाठी खास ‘व्हॅक्सीन’ (लस) देण्यात येते. सुरुवातीला 6 महिने दर आठवड्याला 1 इंजेक्शन, नंतर 6-12 महिने 15 दिवसांनी एक इंजेक्शन घ्यावे लागते. सहसा 50 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा होतो. फायदा दिसला, तर थोडा जास्त काळ सुद्धा देण्यात येते. अशा संपूर्ण कोर्ससाठी सुमारे पाच हजार रुपये लागतात. अर्थात, हे डॉक्टरांवर अवलंबून असते.

  • डॉ. मनोज कुंभार

Back to top button