Latest

Virat Kohli : विराट कोहलीचे अनोखे ‘रेकॉर्ड’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. फलंदाजीच्या जोरावर शतक झळकावण्याचा दुष्काळ कोहलीला संपवता आलेला नसला तरी त्याच्या नावावर दिवसेंदिवस विक्रमांची नोंद होत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ३७२ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. यासह भारताने दोन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली. यासोबतच विराट कोहलीने (Virat Kohli) क्रिकेटर म्हणून जे काम केले आहे ते इतर कोणताही खेळाडू अजूनही करू शकलेला नाही.

खरं तर, कोहली (Virat Kohli) जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे ज्याने तिन्ही फॉरमॅटमधील सामन्यांमध्ये संघाला ५० किंवा त्याहून अधिक विजय मिळवून दिले आहेत. कोहलीने एक खेळाडू म्हणून ५० कसोटी, १५३ एकदिवसीय आणि ५९ टी २० सामने जिंकले आहेत. कोहलीशिवाय, (Virat Kohli) तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान ५० विजयांमध्ये सहभागी असलेला जगातील दुसरा कोणत्याही खेळाडूचा समावेश नाही.

याशिवाय कोहलीने (Virat Kohli) कर्णधार म्हणूनही विशेष कामगिरी केली आहे. कोहली हा एकमेव कर्णधार आहे ज्याने संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये ३० किंवा त्याहून अधिक विजय मिळवून दिले आहेत. कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आतापर्यंत ६६ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३९ सामने जिंकले आहेत. तर १६ गमावले असून ११ सामने अनिर्णित राहिले आहेत. मायदेशात त्याने ३१ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये त्याने २४ जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये ९५ सामने आणि ५० टी-२० सामन्यांमध्ये ३० सामने जिंकले आहेत. याशिवाय कोहली जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून, कोहली १३ सामने जिंकून विजयांमध्ये आघाडीवर आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने परदेशी भूमीवरही मालिका जिंकली आहे, तर देशांतर्गत स्तरावरही भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. न्यूझीलंडवर ३७२ धावांनी मिळवलेला विजय हा घरच्या मैदानावरील सर्वात मोठा कसोटी विजय आहे, जो कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला होता, तर २०१६ मध्ये इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने हे तिन्ही मोठे विजय मिळवले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT