Latest

त्रिपुरातील दंगलीवरून राज्यातील मुस्लिम मोर्चांना हिंसक वळण; विविध ठिकाणी तोडफोड

backup backup

त्रिपुरामध्ये होत असलेल्या जातीय दंगलीवरून राज्यात मुस्लिम संघटनांकडून विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक ठिकाणी हिंसक संघर्ष झाला.

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद उमटले. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने शुक्रवारी बंद पाळला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी देगलूर नाका येथे जिल्ह्यातील मुस्लीम बांधव एकत्र जमले होते. परतीच्या वेळी काही समाजकंटकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक दगड पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. तसेच शिघ्र गती दलाच्या एका जवानाच्या पायाच्या नसा तुटल्या तर दुसर्‍या एका जवानाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

पोलिसांच्या मोबाईल व्हॅनलाही समाजकंटकांनी लक्ष्य केले. परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी पोलिसाना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तरीही जमाव पांगत नसल्याने प्लास्टिक बुलेट फायर करण्यात आल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री उशिरापर्यंत धरपकड करत पोलिसांनी सुमारे १५ जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया इतवारा पोलिस ठाण्यात सुरु होती. नरवाडे यांच्या पायातून रक्त सांडत असतांनाही ते जखमेवर रुमाल बांधून अखेरपर्यंत घटनास्थळावरुन हलले नाहीत.

मालेगाव बंद दरम्यान दगडफेक लाठीचार्ज

त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काही मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. दुपारपर्यंत पूर्व भागात बंद शांततेत पार पडला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास राहूलनगर भागातून एक जमाव पांजरापोळच्या दिशेने चालून आला. तो जुना मुंबई-आग्रा महामार्गावर दाखल झाला.

त्यातील काहींनी सुरू असलेले दुकाने पाहून दगडफेक केली. यातून एकच गोंधळ उडून पळापळ सुरू झाली. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळपासूनच बंदोबस्तावर असलेले पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह अतिरिक्त कुमकही धावून आली. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर जमाव राहूलनगरच्या दिशेने माघारी फिरला.

नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्येही पडसाद

त्रिपुरा राज्यातील हिंसे विरोधात शहरातील मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळाने दि १२ रोजी तहसीलदारांना निवेदन देत त्यांचे व्यवसाय एक दिवसासाठी बंद ठेवले त्रिपुरासारख्या घटनांची पुनरावृत्ती देशभरात होऊ नये यासाठी प्रतिबंध घालण्यात यावा व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.

परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी! : फडणवीस

राज्यात झालेल्या हिंसाचारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!

तर त्यांना धडा शिकवला पाहिजे : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुस्लिम समाजाला बदनाम करणाऱ्या मूठभर लोकांना धडा शिकवला पाहिजे. परिस्थिती चिघळू नये यासाठी राज्य सरकारने लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

हे ही वाचलं का?

SCROLL FOR NEXT