सलमान खुर्शिद म्हणजे पुरुषातील कंगना रनौत; संजय राऊत यांची टीका | पुढारी

सलमान खुर्शिद म्हणजे पुरुषातील कंगना रनौत; संजय राऊत यांची टीका

मुंबई, पुढारी ऑनलाईन

हिंदुत्वाची तुलना आयसीसी आणि बोको हराम या संघटनांशी केल्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद salman khurshid यांच्यावर टीका करत त्यांची तुलना कंगना रनौत हिच्याशी केली आहे. खुर्शिद हे पुरुषातील कंगना रनौत आहेत असे राऊत म्हणाले.

खुर्शिद यांनी आपल्या पुस्तकात अनेक धक्कादायक लेखन केले आहे. यावरून सध्या वाद सुरू आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले, ‘खुर्शिद हे पुरुष वेषातील कंगना आहेत. अशा प्रकारची वक्तव्ये करुन काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवून घेणारे नेते काँग्रेस आणि राहुल गांधींना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तथाकथित नेते विद्वान आहेत, पुस्तके लिहितात, एखादी ओळ हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करुन आपल्या पोळ्या भाजून घेतात. हिंदू धर्माला ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या संघटनांची उपमा देणे हे कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखाच आहे.’

‘हिंदुत्वाने काय केले आहे? काही लोक चुकीचे वागले असतील. ते इस्लाम आणि इतर धर्मातही आहे. पण त्याचे खापर संपूर्ण धर्मावर फोडणे चुकीचे आहे. ही मुर्खाची लक्षणे आहेत. आम्ही निषेध आणि धिक्कार करतो.

सलमान खुर्शिद टीका : काय लिहिलंय पुस्तकात?

‘सनराइज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘सध्याच्या आक्रमक राजकीय हिंदुत्वाने साधू-संतांच्या पूर्वापार आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला केले आहे. आत्ताचे हिंदुत्व हे ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या इस्लामिक संघटनांप्रमाणे जिहादी प्रवृत्तीचे आहे.’

अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात खुर्शीद salman khurshid यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात अयोध्या निकालाचे समर्थन करताना या मुद्द्यावरून पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. बुधवारी (दि. १०) संध्याकाळी उशिरा हे पुस्तक प्रकशित करण्यात आले. मात्र प्रकाशनानंतर अवघ्या २४ तासांत खुर्शीद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केल्याने हा वाद वाढला आहे.

हेही वाचा : 

पहा व्हिडिओ

Back to top button