बीड जिल्ह्यात मानवी क्रौर्याचा कळस; तब्बल ४०० जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

बीड जिल्ह्यात मानवी क्रौर्याचा कळस; तब्बल ४०० जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बीड : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीच्या असहय्यतेचा गैरफायदा घेत सहा महिन्याच्या काळात तब्बल चारशे जणांनी अंबेजोगाईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान ही बाब उघडकीस आल्याची माहिती बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी दिली.

बालहक्क कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की, एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या वडिलांनी लावून दिले होते. सासरी नवरा सांभाळत नसल्याने ती वडिलांकडे रहायला आली. परंतु त्यांनीही तिला सांभाळले नाही.

अंबेजोगाईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार : ४०० नराधमांमध्ये एका पोलिसाचाही समावेश

यामुळे ती अंबाजोगाई बसस्थानक परिसरातच रहायची. या सहा महिन्याच्या काळात चारशेजणांनी अत्याचार केल्याचे जबाबात म्हटले आहे. तसेच एका पोलिस कर्मचार्‍यानेही अत्याचार केल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात बालविवाह प्रकरणी वडिलांसह नातेवाईकांवर व अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुरवणी जबाबात आणखी आरोपींची नावे समोर येतील असे डॉ. अभय वनवे यांनी सांगितले.

सदरील मुलीने दिलेल्या जवाबात ही माहिती समोर आली. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. सध्या मुलगी निरीक्षणगृहात असून लवकरच पुरवणी जवाब नोंदवून कार्यवाही केली जाणार आहे.
डॉ.अभय वनवे, बाल कल्याण समिती अध्यक्ष

 

अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी सजग रहायला हवे. आपल्या परिसरात एखादे बालक संकटात असेल तर त्याच्या मदतीसाठी प्रयत्न करावेत. पोलिस अथवा बालहक्क कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मदत मिळवून द्यायला हवी.
तत्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते.

हेही वाचा : 

Back to top button