Latest

गोवा स्पॉंज कारखान्याचे परवानगीआधीच विस्तारीकरण; धक्कादायक प्रकार उघडकीस, जनसुनावणीत गदारोळ

मोहन कारंडे

मडगाव; विशाल नाईक : गोवा स्पॉंज कारखान्याने जनसुनावणी होऊन परवानगी मिळवण्यापूर्वीच कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे केवळ डोळ्यांना पाणी लावण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार आंबेउदक येथील ग्रामस्थांनी उघडकीला आणला. कुडचडेच्या रवींद्र भवनात आज (मंगळवार) आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरल्याने सुनावणीत गदारोळ झाला.

सावर्डे मतदारसंघाच्या सांतोण गावात अनेक वर्षांपासून गोवा स्पॉंज कारखाना सुरू आहे. या प्रकल्पाचे आणखी विस्तारीकरण केले जाणार आहे. पण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा स्पॉंज कारखान्यामध्ये मिलिभगत आहे, असा गंभीर आरोप कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघातील लोकांनी केला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वास्तविक पाहणी न करता या प्रकल्पाच्या विस्तारिकरणाला परवाना देण्याचा घाट रचला आहे. कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला परवानगी देऊ नये, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांच्या समोर मंगळवारी जनसुनावणी पार पडली. या सुनावणीला कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. जनसुनावणी वातानुकूलित सभागृहात घेण्यापेक्षा सांतोन गावात  प्रकल्पामुळे प्रभावीत होणाऱ्या लोकांमध्ये जाऊन घ्यावी, अशी भूमीका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. तसेच प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळण्यापूर्वीच कंपनीने प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. आजची ही सुनावणी डोळ्यांना पाणी लावण्यासाठी घेतली जात असल्याचा असा आरोप आंबेउदक ग्रामस्थांनी केला. यावेळी प्रीती देसाई यांनी कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणावर आवाज उठवला म्हणून कंपनीने कामावरून काढून टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच मी अकरा वर्षें केवळ चाळीस रुपये प्रतिदिन रोजंदारीवर काम केले. या कारखान्यामुळे रात्रंदिवस आपण त्रास सहन करत आहे. कोणत्याही परिस्थितीत विस्तारीकरणाला परवानगी देऊ नये अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

गोवा स्पॉंज प्रकल्पाने काही समाजासाठी काम केले असते, तर एवढ्या वर्षांत सावर्डे आणि कुडचडेचा भरभराट झाला असता. माझी पत्नी गंभीर आजारी आहे. त्याला सर्वस्वी या कारखान्यातून निर्माण होणारे प्रदूषण कारणीभूत आहे. या प्रकल्पामुळे आम्ही आमच्या मुलांची थडगी उभारत आहे, असे माजी नगरसेवक मनोहर नाईक म्हणाले. आंबेउदक येथील राजेंद्र शिरोडकर यांनीही प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. या प्रकल्पाने गावांतील हिरवळ संपवली आहे. प्रकल्पाच्या गाड्या आमच्या गावातून जातात, त्याचा आम्हाला त्रास होतो. शिवाय नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रदीप नाईक यांनी या प्रकल्पामुळे घरात भूकटी पसरते, जी उपकरणे लावली आहेत ती सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. ग्रामस्थांचा विचार न करता विस्तारीकरणाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने सुनावणीत गदारोळ झाला. यावेळी शर्मीला मोंटेरो उपस्थित होत्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT