पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. फेब्रुवारी 2022 मध्ये कुदळवाडी, चिखली येथे हा प्रकार घडला. अजिंक्य विकास पाटील (वय 27, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 16 वर्षीय मुलीच्या आईने 17 जुलै रोजी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षांपासून आरोपी फिर्यादी यांच्या मुलीचा पाठलाग करीत होता.
दरम्यान, 2 सप्टेंबर 2021 रोजी फिर्यादी यांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला प्रेमाची मागणी घातली. मात्र, मुलीने त्यास नकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, घडलेल्या प्रकाराबाबत आई, वडिलांना सांगितले तर तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.