Latest

राईस प्लेटसह वडापावही महागला, गॅस, खाद्यतेलाच्या भाववाढीचा फटका

स्वालिया न. शिकलगार

मंचर (पुणे) : संतोष वळसे-पाटील

गॅस, खाद्यतेल व इतर वस्तूंच्या सततच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचा वडापाव महागला आहे. ८ ते १० रुपयांना मिळणारा वडापाव आता १२ ते १५ रुपयांना मिळत आहे. सर्वसामान्यांच्या जेवणासाठी असणाऱ्या राईस प्लेटचेही भाव कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

गेली दीड-दोन वर्षे कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला. लॉकडाऊनच्या काळात सर्वात कडक निर्बंध हॉटेल व्यवसायावर लावण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसान सहन केलेल्या हॉटेल व्यावसायिकांना कोरोनानंतर तरी हॉटेल व्यवसाय चांगला चालेल व आपले काेराेना काळात झालेले नुकसान भरुन निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र असे काही झालेले दिसत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायाला ग्राहकांची कमी झालेली संख्या, त्यातच कच्च्या मालाचे वाढलेले बाजारभाव यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक ताळमेळ बिघडला आहे. सर्व बाबींचा विचार करून गेली दोन-तीन वर्षे स्थिर असणारे खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याशिवाय हॉटेल व्यावसायिकांपुढे पर्याय राहिलेला नाही.

कच्चा मालाचे दर

पूर्वीचे दर………………… आताचे दर 

गॅस सिलिंडर १ हजार ५०…………. १ हजार ८५०
खाद्यतेलाचा डबा १ हजार ५००……………….. ३ हजार
बेसन (क्विंटल) ५ हजार……………………… ७ हजार ५००
मैदा (क्विंटल) २ हजार २००………………… ३ हजार
पनीर (किलो) २०० ………………………….२४०
बटर (किलो) ४३०…………………….. ४८०
जिरे (किलो) १८८…………………… २४०

गेल्या दोन वर्षात हॉटेल व्यवसायामध्ये वापरात येणाऱ्या कच्च्या मालाचे बाजारभाव दीड ते दोन पटींनी वाढले आहेत. मात्र हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर गेली हॉटेल दोन-तीन वर्षे स्थिर आहेत. या बाबींचा तुलनात्मक विचार करता दरवाढ करण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही.
– सुरेश बाणखेले, हॉटेल मालक, मंचर

सर्वांत कमी दर आंबेगाव तालुक्यात

आंबेगाव तालुक्यात नाष्ट्याची छोटी-मोठी सुमारे ५०० हॉटेल आहेत, तर जेवणाची असंख्य हॉटेल आहेत. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचे दर गेली दोन-तीन वर्षे स्थिर आहेत. जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात सर्वात कमी दर आहेत. मंचर व परिसरातच नाष्ट्याची ७० ते ७५ व जेवणाची १५ ते २० हॉटेल आहेत. हॉटेलचे चालक, मालक व कर्मचारी असे मिळून तालुक्यातील चार हजार ते साडेचार हजार कुटुंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात.

हॉटेलमधील जुने व नवीन दर

प्रकार जुने दर                        नवीन दर
राईस प्लेट ७०ते ८०                ८० ते ९०
चपाती ८                                 १०
फुल राईस ५०                        ६०
काजुकरी १००                        ११०
पनीर मसाला १००                    ११०

याशिवाय शेवभाजी, दालफ्राय, आलूमटार, बैंगन मसाला, चनामसाला, सोयाबीन मसाला, ग्रीनपीस मसाला यांचे दर ८५ रुपयांवरून ९० रुपयांवर गेले आहेत. ही माहिती मंचर येथील आस्वाद हॉटेलचे अजय काटे यांनी दिली.

हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या बाजारभावामुळे महागाईच्या झळा बसू लागल्या. हॉटेल, रेस्टॉरंटमधील दर वाढवणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर होऊन व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे.
-संतोष पिंगळे, हॉटेल श्री लक्ष्मी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, मंचर

हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी खाद्यपदार्थाच्या दरात वाढ करणे गरजेचे आहे.
-सचिन तोडकर, तोडकर मिसळ हाऊस, मंचर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT