पंढरपूर : संत गाडगेबाबांच्या धर्मशाळेचे सेवाकार्य अविरत सुरू | पुढारी

पंढरपूर : संत गाडगेबाबांच्या धर्मशाळेचे सेवाकार्य अविरत सुरू

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून व परराज्यांतून आलेल्या भाविकांसाठी अत्यल्पदरात निवासाची व्यवस्था करण्यात येत असल्याने भाविकांची सोय झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या धर्मशाळेत विश्‍वस्तांमार्फत संत गाडगेबाबा यांची जयंती व पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येते.

मुख्य इमारत गाडगेबाबांच्या सेवा कार्याची आठवण करुन देते, तर बाबांची आठवण जपतच येथील व्यवस्थापन कामकाज करत आहे. मात्र, येथील बाबांच्या सेवा कार्याला शहरातील काही विघ्नसंतोषी लोक अडथळे निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येते. असे असले तरी व्यवस्थापनाकडून गाडगेबाबांच्या कार्याचा हेतू साध्य करण्याचा आटोकाट प्रयत्न व्यवस्थापनाकडून केला जात आहे.

संत गाडगेबाबांचा कार्यकाळ हा 23 फेब्रुवारी 1876 ते 20 डिसेंबर 1956 असा राहिला आहे. गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. स्वत: हातात झाडू घेऊन गावातील स्वच्छता करायचे, घाण साफ करायचे आणि त्या बदल्यात घरोघरी फिरून पोटापुरते अन्न मागायचे. रात्री कीर्तन करायचे आणि यातून स्वच्छतेचा संदेश देत लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा व रूढी दूर करायचे.

या बदल्यात गावकरी बाबांना पैसे गोळा करून द्यायचे. याच पैशातून गाडगेबाबा शाळा आणि धर्मशाळा, वसतिगृहांची उभारणी करायचे. त्यांनी 1920 ला संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण केले. गाडगेबाबांनी पंढरपुरात संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा 1920, गाडगे महाराज परीट धर्मशाळा 1944, गाडगे महाराज व संत चोखामेळा महार धर्मशाळा 1914 या तीन धर्मशाळा बांधल्या.संत गाडगेबाबांच्या संस्थेला माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील हे विश्‍वस्त (मॅनेजिंग ट्रस्टी) लाभल्यामुळे संस्थेच्या वैभवात भर पडली आहे. संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळेच्या मुख्य इमारतीतून यात्रेकरूंमार्फत अल्प उत्पन्न मिळत आहे, तर दोन नंबरच्या इमारतीमध्ये मुलींचे वसतिगृह आहे.

मात्र, संस्थेला त्यापासून उत्पन्न मिळालेले नाही. तर तीन नंबरच्या इमारतीत भाडेकरू आहेत. मात्र, त्यापासूनही उत्पन्न काही मिळत नाही. चौथ्या इमारतीचे मार्च 2020 पर्यंतचे भाडे देऊन समाजकल्याण विभागाने इमारत वापरणे बंद केले आहे. सध्या संस्थेला अल्प उत्पन्न मिळत असल्याने व्यवस्थापनाला काटकसर करून वाटचाल करावी लागत आहे.

विश्‍वस्त डॉ. माधवराव सूर्यवंशी, भाऊसाहेब जाधव, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील या विश्‍वस्तांमार्फत येथील व्यवस्थापन सुरळीत सुरू आहे. या इमारती 1920 च्या काळातील आहेत. मुख्य इमारतींची दुरुस्ती करून आणि उर्वरित तीन इमारतींचे नव्याने बांधकाम करून अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्‍त वास्तू उभारण्याचा मानस आहे.
– अशोक माने, विश्‍वस्त,
संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळा ट्रस्ट, पंढरपूर

Back to top button