Latest

US inflation : अमेरिकेतील महागाईमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ, नेमकं काय आहे कनेक्शन?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेत महागाई दराने (US Inflation) ४० वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Labour Department) जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील महागाई दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १९८२ नंतर अमेरिकेतील महागाईचा हा उच्चांक आहे. अमेरिकेतील महागाईचा तेथील शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारांत घसरण झाली होती. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटले. सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी कोसळल्याचे दिसून आले.

अमेरिकेतील लोक वाढत्या महागाईमुळे हैराण झाले आहेत. गेल्या एका वर्षात पेट्रोलच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जुन्या कार आणि ट्रकांच्या किमतीत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फर्निचर १४ टक्क्यांनी महागले आहे. महिलांची कपडे ११ टक्के महागली आहेत. महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

अमेरिकेत गेल्या वर्षी ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer price index) केवळ १.७ टक्के होता. हळूहळू तो वाढत गेला. ग्राहक किंमत निर्देशांक मार्चमध्ये २.७ टक्के, एप्रिलमध्ये ४.२ टक्के आणि मे मध्ये ४.९ टक्के, जूनमध्ये ५.३ टक्के, ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्के, डिसेंबरमध्ये ७.१ टक्के आणि आता तो ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

US Inflation : महागाई वाढीचे काय आहे कारण?

अमेरिकेत २०२० मध्ये शिरकाव केलेल्या कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी थांबल्या. दुकाने बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले. २ कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे औद्योगिक उत्पादनात घट झाली. महामारीच्या भितीने नवीन गुंतवणूक झाली नाही. पण आता सरकार आणि फेडरल रिझर्व्हने लिक्विडिटी वाढविण्यासाठी केलेल्या उपयांमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था आता सावरली असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणामुळे लोकांना दिलासा मिळाला. अचानक मागणी वाढली आहे पण त्या तुलनेत पुरवठा वाढलेला नाही. यामुळे अमेरिकेत महागाई ४० वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

अमेरिकेतील महागाईचा भारतीय शेअर बाजाराला फटका

अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठल्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. शुक्रवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ९०० हून अधिक अंकांनी घसरला. त्यानंतर ही घसरण ७७३ अंकांनी खाली येत सेन्सेक्स ५८,१५२ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २३१ अंकांनी खाली येत १७,३७४ अंकांवर बंद झाला. ज्यावेळी एखाद्या देशात महागाई वाढते त्यावेळी त्याचा परिणाम दुसऱ्या देशांवरही होतो. अमेरिकत महागाई वाढल्याने अमेरिकेतून इतर देशांत ज्या वस्तू आयात होतात त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. याचा थेट परिणाम देशांतर्गत महागाईवर पडतो.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT