पुढारी ऑनलाईन: सध्या जगभरातील लोक महागाईने हैराण झाले आहेत. जवळपास प्रत्येक मोठ्या देशात महागाई जुने विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. दुसरीकडे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व उपाय अयशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच अमेरिका, चीन, जपान आणि भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षात महागाई वाढण्याची भीती लोकांना वाटत आहे. परिस्थिती अशी आहे की, अमेरिकेत १९८२ नंतर महागाई उच्च पातळीवर आहे, तर दुसरीकडे भारतातील घाऊक महागाईचा आकडा १२ वर्षांतील उच्चांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत पाच दशकांनंतर आता पुन्हा सर्वसामान्यांसह तज्ज्ञांना महागाईची भीती वाटत आहे. नवीन वर्षातही लोकांच्या खिशावरचा बोजा कमी होणार नाही, अशी शक्यता आहे.
कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर जगातील सर्व देशांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अद्यापही झालेल्या नुकसानाची भरपाई होऊ शकली नाही. दुसरीकडे, कोरोनाचे नवीन प्रकार लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. ओमायक्रॉन प्रकाराच्या वाढत्या उद्रेकामुळे, लोकांना पुन्हा निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो अशी भीती आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने जनतेला दुहेरी फटका बसत आहे. परिस्थिती अशी आहे की, गेल्या 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा अर्थज्ञानांबरोबर इतर क्षेत्रातील तज्ञ देखील यामुळे चिंतेत आहेत. बड्या देशांत सतत वाढत चाललेली महागाई पाहता 2022 या नवीन वर्षातही लोकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतातील महागाईबद्दल बोलायचे झाले तर, घाऊक आणि किरकोळ महागाई दर महिन्याला वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई 4.9 टक्क्यांवर पोहोचली आहे. तथापि, हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) विहित मर्यादेत आहे, त्यावर भाष्य करणे अनावश्यक ठरेल. मात्र सर्वसामान्यांसाठी ही वाढ त्रासदायक आहे. दुसरीकडे, जर आपण घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाईवर नजर टाकली तर ती गेल्या 12 वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. त्याचा स्तर फार भीतीदायक वाटत आहे. सध्या देशातील घाऊक महागाई 14.23 टक्क्यांच्या पातळीवर आहे. याआधी 1992 मध्ये घाऊक महागाईचा आकडा 13.8 टक्क्यांच्या पातळीवर होता.
जर आपण 2021 वर नजर टाकली तर, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सलग आठ महिन्यांत भारतातील महागाईचा दर दुहेरी अंकात राहिला आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये महागाई दर 12.54 टक्के होता, तो नोव्हेंबरमध्ये 14.23 पर्यंत वाढला आहे, म्हणजेच 1.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महागाई वाढण्याचे कारण मुख्यत्वे खनिज तेल, बेस मेटल्स, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रासायनिक आणि रासायनिक उत्पादने, अन्न उत्पादने इत्यादींच्या किमतीत झालेली वाढ आहे. आकडेवारीनुसार, इंधन आणि वीज महागाई नोव्हेंबरमध्ये 39.81 टक्क्यांवर पोहोचली, जी ऑक्टोबरमध्ये 37.18 टक्क्यांवर होती. अन्न निर्देशांक मागील महिन्यात 3.06 टक्क्यांवरून दुप्पट वाढून 6.70 टक्क्यांवर पोहोचला.
सर्वेक्षणात मोठी बाब समोर
भारतात खाद्यपदार्थांपासून ते इलेक्ट्रिक उपकरणे आणि कपड्यांपर्यंत सर्वांना महागाईचा फटका बसला आहे. आगामी काळातही या महागाईतून जनतेला दिलासा मिळताना दिसत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातूनही देशातील जनता वाढत्या महागाईची भीती व्यक्त करत असल्याचे समोर आले आहे. RBI ने ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस केलेल्या सर्वेक्षणात असे सूचित होते की, भारतीय जनतेला नजीकच्या काळात महागाई आणखी वाढण्याची भीती सतावत आहे. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 18 प्रमुख शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी या शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ५ हजार ९१० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे.
तीन महिन्यांत महागाई आणखी वाढण्याची अपेक्षा
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पुढील तीन महिन्यांत आणि आगामी वर्षात महागाई वाढण्याची चिंता व्यक्त करणाऱ्या उत्तरदात्यांचे प्रमाण नोव्हेंबर महिन्यात आणखी वाढले आहे. पेट्रोल-डिझेल आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावरील देशांतर्गत उत्पादन शुल्कात कपात होऊनही महागाईबाबत कुटुंबांच्या भावनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2021-22 मध्ये सीपीआय आधारित महागाई 5.3 टक्के राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.
अर्थतज्ज्ञ आहेत चिंतेत
केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग महागाईमुळे हैराण झाले आहे. संपूर्ण जगासमोर हे आव्हान कसे उभे राहिले आहे, हे अर्थतज्ज्ञांना हळूहळू समजू लागले आहे. अमेरिकेतील महागाईने 1982 मध्ये सर्वोच्च पातळीही ओलांडली होती. चीनपासून युरोपपर्यंत या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ब्रिटनमध्येही सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. कोरोना आणि महागाईच्या दुहेरी तडाख्यामुळे लोकांना मार्ग सापडत नाहीये. सर्वसामान्य ग्राहक, उद्योगपती, बँकर्स, राजकारणी हे सर्वच त्रस्त आहेत.
जगभरातील देशांची परिस्थिती वाईट
अगदी अलीकडेच, अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. यूएस मध्ये, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर नोव्हेंबर 2021 मध्ये 6.8 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जून 1982 नंतरचा सर्वोच्च महागाई दर आहे. ऑक्टोबर 2021 मध्येही महागाईचा दर 6.2 टक्के होता आणि सप्टेंबर 2021 मध्ये तो 5.4 टक्के होता. युरोपातील इतर देशांमध्येही जवळपास अशीच परिस्थिती आहे. अमेरिकेतील पीईडब्ल्यू नावाच्या संशोधन केंद्राने जगातील 46 देशांमधील महागाई दराबाबत सर्वेक्षण केले असून त्यात असे आढळून आले आहे की, 39 देशांमध्ये महागाईचा दर हा 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत, कोरोना महामारीपूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१९ च्या पहिल्या तिमाही महागाई दरापेक्षा खूप जास्त आहे.
समाजातील प्रत्येक घटक प्रभावित
महागाईत झपाट्याने होणारी ही वाढ प्रत्येक घटकावर, विशेषत: समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिणाम करते . कारण, एका विशिष्ट मर्यादेत राहणाऱ्या या वर्गाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यांच्या खाण्यापिण्यावर खर्च होतो आणि महागाईचा वाढता दर असाच राहिला तर या वर्गाच्या खाण्यापिण्यावरही विपरीत परिणाम होऊ लागतो. त्यामुळे महागाईचा दर नियंत्रणात ठेवणे हे कोणत्याही देशाच्या सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळे देशाचा आर्थिक विकासदरही मंदावतो.