निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

* गतसप्‍ताहात सप्‍ताहाअखेरच्या दिवशी (शुक्रवारी) निफ्टी व सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 43.90 अंक व 143.20 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17516.3 व 58644.82 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स मध्ये 0.25 टक्के व 0.24 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. एकूण सप्‍ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये 414.35 अंक (2.42 टक्के) व सेन्सेक्समध्ये 1444.59 (2.53 टक्के) अंकांची वाढ नोंदवली गेली.

* आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल पुन्हा भडकले. ब्रेंट कू्रडचा भाव प्रती बॅरल 1.5 टक्के म्हणजेच 1.32 डॉलर प्रतिबॅरलने वधारून 92.43 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला. ऑक्टोबर 2014 नंतरची कच्च्या तेलाची ही सर्वोच्च पातळी आहे. असे असले तरी शुक्रवारच्या दिवशी रुपया चलन मात्र डॉलरच्या तुलनेत सुमारे 16 पैसे मजबूत होऊन 74.70 रुपये प्रति डॉलर किमतीसह बंद झाले. मजबूत रुपया चलनाने बाजारास सावरण्यास मदत केली.

* केंद्र सरकारचा अर्थव्यवस्था वाढीसाठी कर्जे घेण्याचा वेग वाढवण्याकडे (गव्हर्नमेंट बॉरॉविंग्स) कल. या निर्णयामुळे मागील सप्‍ताहात सुमारे 4-5 दिवसांत 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचा दर (10 धशरी-ॠीशल) सुमारे 20 बीपीएस अंकांनी वधारून 6.684 टक्क्यांवरून 6.879 टक्क्यांवर आला. सरकारी रोख्यांचा दर वाढल्याचा परिणाम कॉर्पोरेट बाँडस्वर झाला. कार्पोरेट बाँडस्देखील 10 वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे 15-20 बीपीएस आणि 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 20-25 बीपीएसची दरवाढ पहायला मिळाली. जगभर चालू असणार्‍या व्याजदर वाढीचा परिणाम भारतीय सरकारी रोखे व कॉर्पोरेट बाँडस्वर पहायला मिळाला.

* गतसप्‍ताहात गुरुवारच्या दिवशी फेसबुकची प्रमुख कंपनी (पॅरेंट) ‘मेटा’चा समभाग 26 टक्के कोसळला. एका दिवसात कंपनीचे भांडवल बाजारमूल्य 230 अब्ज डॉलर्सने घटले. मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती एका दिवसात सुमारे 29 अब्ज डॉलर्सनी घटली. कोणत्याही अमेरिकन कंपनीचे भांडवल बाजारमूल्य एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा हा विक्रम आहे. कंपनीची महसूलवाढ धीम्या गतीने होत असून, अ‍ॅपलसारख्या मोबाईल/लॅपटॉप कंपनीने आपल्या जाहिरात विषयक नियमांमध्ये (प्रायव्हसी पॉलिसी) बदल केल्याचा फटका फेसबुकला बसल्याचे कंपनीचे प्रतिपादन.

* देशातील महत्त्वाची स्टील कंपनी ‘टाटा स्टील’चे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा तब्बल 139 टक्क्यांनी वधारून 9598 कोटींवर पोहोचला. कंपनीच्या महसुलातदेखील 45 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 60783 कोटींवर पोहोचला.

* ‘भारत पे’चे अश्‍नीर ग्रोव्हर (सहसंस्थापक) यांची कंपनीतून बाहेर पडण्यासाठी गुंतवणूकदारांकडे 4 हजार कोटींची मागणी. सध्या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 6 अब्ज डॉलर्स (सुमारे 45 हजार कोटी) असून त्यापैकी 9.5 टक्के हिस्सा ग्रोव्हर यांच्याकडे असल्याचे ग्रोव्हर यांचे प्रतिपादन. मे 2021 मध्ये कंपनीने 3 अब्ज डॉलर्स बाजारमूल्याच्या किमतीवर 370 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला होता; परंतु त्यानंतर कंपनीकडे बँकेचा परवाना आला असून पीएमसी बँकदेखील ताब्यात आली असल्याने कंपनीचे बाजारमूल्य दुप्पट झाल्याचे ग्रोव्हर यांचे म्हणणे. कंपनीचे संचालक मंडळ गुंतवणूकदार आणि अश्‍नीर ग्रोव्हर यांच्यात वाद चालू असून ग्रोव्हर काही महिन्यांच्या सुटीवर गेले. ‘नायका आयपीओ’मध्ये गुंतवणूक न करता आल्यामुळे कोटक बँकेच्या कर्मचार्‍याला फोनवरून दूषणे देत असल्याची कथित ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने ग्रोव्हर अडचणीत आले होते.

* जानेवारी महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे तब्बल 1.38 लाख कोटींचा महसूल मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत हा महसूल 15 टक्के अधिक आहे. 1.30 लाक कोटींपेक्षा अधिक जीएसटी महसूल मिळालेला हा सलग चौथा महिना आहे. केवळ राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्यात जीएसटी कराचे 20,704 कोटींचे करसंकलन झालेे.

* चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत टाटा मोटर्सची निराशाजनक कामगिरी. या तिमाहीत कंपनीला 1451 कोटींचा तोटा सहन करावा लागला. जगभरात निर्माण झालेल्या ‘सेमीकंडक्टर चीप’च्या टंचाईमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागला. कंपनीच्या महसुलातदेखील 4.5 टक्क्यांची घट होऊन महसूल 72229 कोटींवर.

* देशातील महत्त्वाची सरकारी बँक. बँक ऑफ इंडियाचा नफा तिसर्‍या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 90 टक्के वधारून 1027 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्‍नात 8.8 टक्क्यांची घट होऊन उत्पन्‍न 3408 कोटी. तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स) तब्बल 81 टक्क्यांची घट होऊन तरतुदी 335 कोटींवर. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 13.25 टक्क्यांवरून 10.46 टक्के झाले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाणे (नेट एनपीए) 2.46 टक्क्यांवरून 2.66 टक्क्यांपर्यंत वाढले.

* पुढील वर्षीपासून आभासी चलनांमधून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर भरावा लागणार. यासाठी करविवरण पत्रामध्ये वेगळा रकाना असेल.

* आर्थिक वर्ष 2022-23 पासून भारतात ई-पासपोर्ट जारी केले जाणार. पासपोर्टवर इलेक्ट्रॉनिक चीफ बसवली जाणार असून यामध्ये पासपोर्टधारकाची माहिती साठवली जाणार. इमिग्रेशनच्या रांगांमध्ये होणारा वेळेचा अपव्यय यामुळे टळेल.

* 28 जानेवारी रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 4.531 अब्ज डॉलर्सनी घटून 629.755 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

* एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी ‘नीलाचल इस्पात निगम’ टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलने 12,100 कोटींना विकत घेतली.

Back to top button