Latest

UPI Payment : देशात यूपीआय पेमेंटस्ची गगनभरारी!

Arun Patil

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : UPI Payment : देशात गेल्या दशकात बँकांच्या डेबिट कार्डने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असले तरी त्यानंतर दाखल झालेल्या विशेषतः कोरोनानंतर अधिक लोकप्रिय ठरलेल्या यूपीआय पेमेंट पद्धतीने आर्थिक व्यवहारासाठी सर्वाधिक लोकप्रियता मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस तथा यूपीआय व्यवहाराने डेबिट कार्डचा वापर धिमा केला असून मोबाईल अ‍ॅपद्वारे सहज सुलभ होणार्‍या यूपीआय व्यवहारांमध्ये सुमारे 428 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयी एक माहितीचा डाटा प्रसिद्ध केला आहे. यानुसार देशातील डेबिट कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांचा वापर दिवसेंदिवस कमी होतो आहे. त्याचसोबत बँकांच्या क्रेडिट कार्डचा वापरही कमालीचा घटला असून सर्वसामान्य छोट्या व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंट पद्धतीला जनतेने आपलेसे केले असल्याचा रिझर्व्ह बँकेचा डाटा सांगत आहे. (UPI Payment)

जुलै 2020 मध्ये कोरोना काळात डेबिड कार्डद्वारे देशात केलेल्या व्यवहारांचे एकूण मूल्य 2.81 लाख कोटी इतके होते. जुलै 2023 मध्ये हे मूल्य 11.96 टक्क्यांची वाढ नोंदवित 3 लाख 15 हजार कोटींवर पोहोचले, तर त्या तुलनेत यूपीआय पद्धतीद्वारे जुलै 2020 मधील एकूण व्यवहारांचे 2 लाख 90 हजार कोटी रुपयांचे मूल्य जुलै 2023 मध्ये सुमारे 428 टक्क्यांची वाढ नोंदवत 15 लाख 33 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT