नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी कधी एक तर कधी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीची मागणी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधींनी ३ सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाचा धक्का दिला. या निर्णयाने नागपुरमधील भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे. तर काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे नागपूर महापालिकेत काँग्रेसचा घात झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. भाजपने आपल्या राजकीय सोयीसाठी चारच प्रभाग केला होता. त्याचा प्रचंड फायदा भाजपला झाला. सर्वांचा अंदाज चुकवत मागील महापालिकेच्या निवडणुकीत १५१ पैकी भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडणूक आले.
दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नावालाच उरले. अनेक वर्षे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसचाही दारुण पराभव झाला होता. त्यांचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व पाहाता बहुसदस्यीय प्रभाग पद्धती बदलण्यासाठी काँग्रेस आग्रही होती.
महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याची अधिसूचना जाहीर केली होती.
त्यानुसार सर्व महापालिकांना प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच निवडणूक होईल असे जवळपास निश्चित झाले होते.
प्रभाग किती सदस्यांचा करावा याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद होते. प्रत्येक नेता आपल्या शहरातील राजकीय सोयीनुसार मागणी करीत होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करावी याविषयी आग्रही होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा याला पाठिंबा होता. मात्र शिवसेनेचा विरोध होता, असे समजते. शेवटी दोनचा, चारचा न करता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर समझोता झाल्याचे कळते.
निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार महापालिका प्रशासनाला कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. दोन सदस्यीय प्रभाग पद्धत केली असती तर एकमेकांना प्रभाग जोडणे तुलनेत सोपे गेले असते.
आता ३ सदस्यीय प्रभाग पद्धती यानुसार नव्याने रचना करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने रचना करण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. नागपुरसह सर्वच महापालिकांचा कार्यकाळ जवळपास फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे.