पुढारी ऑनलाईन डेस्क : अवघ्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कित्येक दिवसांनंतर पहिल्यांदाच विधिमंडळाची पायरी चढताना पहायला मिळाले. पण त्यांनी सभागृहात अनुपस्थिती दर्शविली. महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर त्यांनी सर्व राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं. (Uddhav Thackeray)
महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोनासारख्या संकटाचा मुकाबला केला आहे. कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आलं होतं. त्या संकटापुढं सध्याचं संकट काहीच नाही. या संकटाचा देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुकाबला करू. आपल्याला संघर्ष करायचा असून न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जनता सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहत असते. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत तोपर्यंत या देशात लोकशाहीच राहील. बेबंदशाही येऊ देणार नाही. असं मत आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या मुद्यावर कोर्टाचा निर्णय काय येईल यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. यावर ते आज विधानसभा अधिवेशन दरम्यान बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी विधिमंडळात हजर राहिले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. सध्याच्या सत्तापालटानंतर शिवसेनेपुढे अस्तित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.
हेही वाचा