पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच अमेरिकेने सीरियातील दोन ठिकाणांवर हल्ला केला आहे. सीरियातील इराण इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पस आणि इराणच्या पाठवबळावर चालणाऱ्या या तळांना यात लक्ष करण्यात आले. इराक आणि सीरियातील अमेरिकेच्या फौजांवर हल्ले झाल्यानंतर अमेरिकेन हा हल्ला केला. या हल्ल्याचा हमास-इस्रायल संघर्षाशी संबंध नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन म्हणाले, "अमेरिकेला कोणाताही संघर्ष नको आहे. तसेच कोणत्याही शत्रुत्वात गुंतण्याची अमेरिकेची इच्छा नाही. पण इराणच्या पाठबळावर अमेरिकेच्या सैनिकांवर झालेले हल्ले मान्य होण्यासारखे नाहीत." लाइव्ह मिंटने ही बातमी दिली आहे. U.S. launched airstrikes Syria
"इराणला या हल्ल्यातील त्यांची भूमिका लपवून ठेवायची आहे, पण आम्ही हे होऊ देणार नाही. इराणच्या हस्तकांकडून असे हल्ले सुरू राहिले तर आम्ही आमच्या नागरिकांना वाचवण्यासाठी कडक भूमिका घेऊ शकतो," असे ते म्हणाले.
ऑक्टोबर १७ पासून इराक आणि सीरियातील अमेरिकेशी संबंधित १२ तळांवर हल्ले झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे २१ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हे हल्ले ड्रोनच्या मदतीने करण्यात आले होते. लॉईड म्हणाले, "अमेरिकेचे हल्ला नियंत्रित स्वरूपाचे होते. याबाबतीत आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्याची आमची भूमिका आणि धोरण सुस्पष्ट आहे." U.S. launched airstrikes Syria
मार्च महिन्यात इराणशी संबंधित काही सशस्त्र गटांनी सीरियात हल्ला करून एका अमेरिकन नागरिकाची हत्या केली होती, यात ७ लोक जखमीही झाले होते. यानंतरही अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केले होते. अमेरिकेने या हल्ल्याचा गाझाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पण इराणने मात्र अमेरिका इस्रायलला शस्त्र पुरवत असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा