Latest

पुणे : खेड शिवापूर येथे अपघातात दोन ठार; एक जण गंभीर जखमी

अमृता चौगुले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे-सातारा सेवा रस्त्यावर वेळू (ता. भोर) गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अशोक सदाशिव गायकवाड (वय ६४, रा. कुसगाव, ता. भोर) व रमजान अली (वय २२, सध्या रा. ससेवाडी, ता. भोर, मूळ रा. सिसेहुसेपूर, ता. जि. शिवान, बिहार) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर मोहरम अली हे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूरहून वेळू गावाकडे सेवा रस्त्याने ॲक्टिवा (एमएच १२ एसबी १८३७) या दुचाकीवरून अशोक गायकवाड जात होते, तर समोरून रमजान अली व त्याच्या पाठीमागे मोहरम सराजउद्दीन अली हे (एमएच १२ जेव्ही ३०४०) या क्रमांकाच्या दुचाकीवरून वेळूकडून खेड शिवापूरकडे भरधाव वेगाने येत होते. या वेळी समोरासमोर ॲक्टिवा आणि या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गायकवाड व रमजान अली यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच खेड शिवापूर येथील श्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या वेळी उपचारापूर्वीच गायकवाड याचा मृत्यू झाला व समोरच्या दुचाकीवर मागे बसलेल्या मोहरम अली याला वाचविण्यात यश आल्याचे डॉ. अमेय कर्णिक यांनी सांगितले.

दुसरीकडे रमजान अली यांना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र त्याचा देखील उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ. डिंबळे यांनी सांगितले. या घटनेचा तपास राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार उमेश जगताप करीत आहेत.

SCROLL FOR NEXT