Latest

naxals killed: कोरची तालुक्यातील चकमकीत २६ नक्षलवादी ठार, ३ पोलिस जखमी

backup backup

आज (दि. १३) सकाळी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली. यात २६ नक्षलवादी ठार झाले असून, ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. या चकमकीत नक्षल्यांचा एक मोठा नेता ठार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.

आज पहाटे सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे जवान संयुक्तपणे छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्य सापडले आहे. २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत, शिवाय ३ पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

अजूनही पोलिसांची सुमारे १५ पथके बोटेझरी परिसरातील भोंडे पहाडीवर नक्षलविरोधी अभियान राबवीत आहेत. घटनास्थळ परिसरात टिप्पागड, कोरची दलम व कंपनी क्रमांक ४ च्या नक्षल्यांचे शिबिर सुरु होते.

३ वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आज पोलिसांनी २६ नक्षल्यांना ठार केले. मागील तीन वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. २२ एप्रिल २०१८ ला भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यात साईनाथ, शिनू हे मोठे नक्षल कॅडर ठार झाले होते. त्यानंतर यंदा २१ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी १३ नक्षल्यांचा खात्मा केला होता. आजच्या चकमकीतही काही मोठे नक्षल नेते ठार झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT