पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शीझान अटकेत आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहे. आता चौकशीदरम्यान, अभिनेता शीझानने तुनिषासोबतच्या नात्याविषयी सांगितले आहे. तसेच तिने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासाही केला आहे. (Tunisha Sharma)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीझानने मान्य केलं की, तो तुनिषासोबत रिलेशनशीपमध्ये होता. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. शीझानने आपल्या जबाबात म्हटलं आहे की, त्या दोघांच्या वयात मोठं अंतर होतं आणि दोघांचे धर्म वेगवेगळे होते. याशिवाय, तुनिषाच्या कुटुंबीयांनी शीझानवर आरोप केले आहेत. त्याचे अनेक तरुणींशी संबंध होते आणि त्याने तुनिषाला धोका दिल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
शीझानने तुनिषाविषयी मोठा खुलासा केला आहे. अभिनेता शीझानने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, तुनिषाने याआधी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शीझानने पोलिसांना सांगितलं की, मृत्यूच्या आधी काही दिवस आधी तुनिषाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी त्याने तुनिषाला वाचवलं होतं. इतकचं नाही, तर याविषयी शीझानने तुनिषाच्या आईलादेखील सांगितलं होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, 'तुनिषाने आपले जीवन संपवण्यापूर्वी एक दिवस आधी काहीही खाल्लं नव्हतं. दुसऱ्या दिवशी शीझानने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने काहीतरी खावे यासाठी शीझानने प्रयत्नदेखील केला. तुनिषाला आपल्यासोबत सेटवर घेऊन जाण्यासाठी शीझानने प्रयत्न केला होता. पण तुनिषाने सांगितले की, तिला थोडा वेळ मेकअप रुममध्येच राहायचं आहे.'
शीझान खान म्हणाला, 'खूप उशीरपर्यंत जेव्हा तुनिषा सेटवर आली नाही. तेव्हा मी स्वत: मेकअप रुमकडे गेला. पण, दरवाजा उघडत नसल्याने टीमसोबत मिळून दरवाजा तोडला. तेव्हा तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला घेऊन रुग्णालयात नेण्यात आले. पण तिला वाचवू शकलो नाही.'